वसई:- वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात दैनंदिन कचरा संकलनासाठी नियुक्त केलेल्या नवीन कंत्राटदारांनी मुंबई महापालिकेची भंगार आणि जीर्ण झालेली वाहने आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. म्हाडा मैदानात उभी करून ठेवलेल्या या वाहनांवर थेट मुंबई पालिकेचे नाव व लोगो असल्याचे समोर आल्यानंतर शहरात जोरदार खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर तिन्ही ठेकेदाराना कारणे दाखवा नोटीस पाठवून भंगार वाहने तात्काळ महापालिकेच्या हद्दीतून हटविण्यात यावीत अशा सूचना करण्यात आली आहे.
वसई-विरार शहरात वाढत्या नागरीकरणामुळे दररोज जवळपास एक हजार ते बाराशे मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने जुना ठेका रद्द करून काही महिन्यांपूर्वीच प्रशासनाने मे. अमृत इंटरप्रायझेस, मे. आर अॅण्ड बी इन्फ्रा प्रोजेक्टस लि. आणि मे. क्रिस्टल इंटीग्रेटेड सर्विसेस लि. या तिन्ही नवीन कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे.
मात्र, या ठेकेदारांनी वसई-विरारमध्ये कचरा वाहतुकीसाठी थेट मुंबई महापालिकेची वापरलेली व मोडीत निघालेली भंगार वाहने आणून म्हाडा मैदानात उभी केल्याचे निदर्शनास आले. अत्यंत जीर्ण झालेली ही वाहने मुख्य रस्त्यावर उतरवल्यास ती कधीही बंद पडून कचरा वाहतूक ठप्प होण्याचा आणि गंभीर अपघात घडण्याचा मोठा धोका व्यक्त केला जात आहे.
याबाबत स्थानिक पदाधिकारी व नागरी समाजसेवकांनी यावर तीव्र आक्षेप घेत पालिकेकडे विचारणा केली होती.या प्रकरणानंतर आता महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने तिन्ही ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावत मुंबई महापालिकेची असलेली भंगार वाहने ही तात्काळ हटवून त्याबाबतचा अहवाल महापालिकेला सादर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
वाहन योग्यता प्रमाणपत्र सादर करा
या प्रकरणावर बोलताना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त जितेंद्र नाईक यांनी सांगितले की, “या वाहनांच्या संदर्भात माहिती मिळताच तातडीने संबंधित ठेकेदारांना सूचना दिल्या आहेत. कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र व वाहनांच्या स्थितीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे, अन्यथा ही वाहने चालवू दिली जाणार नाहीत असे त्यांनी सांगितले आहे.
वाहने जागच्या जागीच
सध्या या भंगार वाहनांवरून शहरात जोरदार चर्चा सुरू असून, केवळ जुन्या आणि मोडीत निघालेल्या गाड्यांना वरून रंगरंगोटी करून त्या सुस्थितीत असल्याचे भासविण्याचा प्रयत्न कंत्राटदारांकडून केला जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. नोटीस बजावून ती वाहने हटविण्याच्या सूचना देऊन दोन आठवडे झाले मात्र तरीही अजूनही म्हाडा येथील मैदानात ही वाहने जागच्या जागीच उभी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
