वसई: वसई विरार महापालिकेने मालमत्ता कर थकीत ठेवणाऱ्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त केल्या आहेत. यंदाच्या वर्षात जवळपास पालिकेने २ हजार ८६३ जप्त केल्या आहेत. त्यांची लिलाव प्रक्रिया राबविण्यासाठी त्यांचे मूल्यांकन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

वसई विरार महापालिका हद्दीत १० लाख १६ हजार एवढ्या मालमत्ता आहेत. त्यात छोट्या मोठ्या औद्योगिक वसाहती, उपहारगृहे, इमारती, सदनिकाआदींचा समावेश आहे. यातून मिळणारा मालमत्ता कर हा प्रमुख स्रोत आहे. त्यातून उत्पन्न स्वरूपात मिळणारा निधी हा विकास कामांसाठी महत्त्वाचा ठरतो. २०२५- २६ या वर्षात महापालिकेने ८६० कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी केवळ ४०० कोटी इतका मालमत्ता कर वसूल करण्यात महापालिकेला यश आले होते.

मात्र काही मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरणा न केल्याने कोट्यावधी रुपयांची रक्कम थकीत राहिले आहेत. थकबाकीदार मालमत्तांचे महापालिकेने सर्वेक्षण पूर्ण केले होते. त्यानुसार थकीत मालमत्ता धारकांना नोटिसा ही काढण्यात आल्या होत्या. याशिवाय विविध प्रकारे उपाययोजना करून कर भरणा करण्यास विनवणी केली जात होती. मात्र तरीही या थकबाकीदार कर भरणा करण्यासाठी पुढे येत नसल्याने त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कारवाई महापालिकेने २ हजार ८६३ इतक्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

या जप्त केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी मालमत्ता कर संकलन विभागाकडून प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी सर्व मालमत्तांचे मूल्यांकन करून कराची थकीत रक्कम आहे त्याची वसुली केली जाईल असे उपायुक्त ( मालमता कर संकलन ) स्वाती देशपांडे यांनी सांगितले आहे.