वसई: वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागणीबाबत गुरुवारी श्रमजीवी संघटनेने ठिय्या आंदोलन पुकारले होते. तसेच या प्रलंबित मागण्या येत्या ७ दिवसांत मार्गी न लागल्यास १८ जून २०२६ पासून पालिका क्षेत्रात तीव्र कामबंद आंदोलन छेडण्याचा निर्वाणीचा इशारा श्रमजीवी रयत कामगार संघटनेने दिला आहे.
वसई विरार महापालिकेच्या घनकचरा विभागात गेल्या अनेक वर्षांपासून दोन ते तीन हजार ठेका कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांना वेळेवर न मिळणारे वेतन, थकीत उपदान (ग्रॅच्युइटी) व सुट्टीचा पगार अशा विविध मागण्यांसाठी गुरुवारी श्रमजीवी रयत कामगार संघटनेने पालिका मुख्यालयात तिसऱ्या मजल्यावर ठिय्या आंदोलन पुकारले होते.
तसेच पालिका अधिकाऱ्यांना विविध मागण्यांबाबत निवेदनही त्यांनी सादर केले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अनंत इंटरप्रायझेस या कंपनीकडील सफाई कामगारांचे ६ ते ८ महिने उलटून गेले तरी सुट्टीचा पगार अद्याप थकीत आहे. तसेच, कायद्यानुसार एकाच आस्थापनेत ५ वर्षांपेक्षा जास्त काम केलेल्या कामगारांना कंत्राट संपल्यावर ग्रॅच्युएटी मिळणे बंधनकारक आहे. महापालिकेने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी नोटीस बजावूनही कंत्राटदारांनी अद्याप कामगारांना ग्रॅच्युएटी अदा केलेली नाही आणि पालिका प्रशासनाला याचा कोणताही लेखी अहवाल सादर केलेला नाही, असा गंभीर आरोप पत्रात करण्यात आला आहे.
पावसाळा सुरू झाला असतानाही नवीन कंत्राटदाराने अद्याप कामगारांना गणवेश, पगार पावती, ओळखपत्र आणि पावसाळी सुरक्षा साहित्य दिलेले नाही. याशिवाय, नवीन कार्यरत कंत्राटदारांनी सफाई कर्मचाऱ्यांचा मेडिक्लेम विमा उतरवलेला नसल्याने कामावर असताना अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
कंत्राटदार सफाई कामगारांकडून २७ दिवस काम करून घेत असून त्यांना केवळ २६ दिवसांचाच पगार देत आहेत आणि कामगारांच्या हक्काचा १ दिवसाचा पगार कंत्राटदार परस्पर लाटत असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच येत्या ७ दिवसांत या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा न निघल्यास, १८ जूनपासून पालिकेविरोधात कामबंद आंदोलन पुकारण्यात येईल, अशी माहिती संघटनेचे कार्यकारी सदस्य मंगेश मोरे यांनी दिली आहे.
कामगारांवर कामाचा अतिरिक्त ताण
नियमानुसार २५ ते ३० कामगारांमागे एक मुकादम असणे आवश्यक आहे. मात्र असे असतानाही प्रभाग समिती अ मध्ये तब्बल ४० ते ५० मुकादम कार्यरत आहेत. या अतिरिक्त मुकादमांमुळे कामाचे ओझे थेट सामान्य सफाई कामगारांवर पडत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
