वसई: अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशउत्सव मंडळे ही तयारीला लागली आहेत. या मंडळांना आवश्यक लागणाऱ्या परवानग्या मिळण्यासाठी पालिकेने एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. वसई विरार मध्ये विविध ठिकाणच्या भागात मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र तो साजरा करताना नागरी सुरक्षेच्या दृष्टीने विविध प्रकारच्या परवानग्या लागतात. याआधी लागणाऱ्या परवानग्या मिळविण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना हेलपाटे मारावे लागत आहे.
आता राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्या यासाठी पालिकेकडून एक खिडकी हा उपक्रम राबविला जात आहे. या परवानगीसाठी मागील वर्षापासून ऑनलाइन सुविधा पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.गणेशोत्सव मंडळांना पालिकेच्या स https://mandap.onlinevvcmc.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात अर्ज करता येणार आहे.या अर्जाची पालिकेकडून प्राथमिक तपासणी करून पोलीस विभाग, वाहतुक नियंत्रण शाखा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व अग्निशमन विभाग यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पोर्टलद्वारे पाठविला जाणार आहे.
त्यांच्याकडून मिळालेल्या परवानग्या व नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन पोर्टल द्वारे परवानगी दिली जाईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारणी केली जाणार असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. याआधी शहरातील साडेचारशेहून अधिक मंडळांना ऑनलाइन पोर्टलद्वारे परवानग्या देण्यात आल्या होत्या. पालिकेच्या परवानगीच्या या योजनेमुळे मंडळांना एकाच छताखाली सर्व परवानग्या प्राप्त करवून घेता येणार आहेत. त्यामुळे रीतसर परवानगी घेऊनच उत्सव साजरा करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.
