वसई:- वसई विरार महापालिकेच्या महापौर, उपमहापौर, सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता निवडीनंतर आता सर्वांचे लक्ष स्थायी सभापतीच्या निवडीकडे लागले आहे. स्थायी समितीच्या सभापती पदाची निवड ही येत्या ५ मार्चला होणार आहे. त्यामुळे सभापतीपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वसई विरार महापालिकेच्या सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या स्थायी समिती सदस्यांची निवड २० फेब्रुवारीला पार पडलेल्या पहिल्या महासभेत करण्यात आली होती. यावेळी १६ सदस्यांची निवड झाली होती. यात बहुजन विकास आघाडीचे प्रवीण शेट्टी, नरेंद्र पाटील,लॉरेल डायस, पंकज पाटील, रंजना थालेकर, प्रफुल्ल पाटील, चंद्रशेखर धुरी, सुनील आचोळकर, स्वप्निल कवळी व आलमगीर डायर या नगरसेवकांचा समावेश आहे.

तर भाजपमधून प्रज्ञा पाटील, महेश सरवणकर, दर्शना त्रिपाठी, निलेश चौधरी, जितेंद्र पाटील, अभय कक्कड या नगरसेवकांची स्थायी समिती सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामुळे पुढील १ वर्षाच्या कालावधीसाठी १६ नगरसेवकांची स्थायी समितीत वर्णी लागली आहे. या सोळा सदस्यांमधूनच सभापतीची निवड होणार आहे.

सभापती निवडीचा कार्यक्रम विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार ५ मार्च २०२६ रोजी लावण्यात आला आहे. वसई विरार महापालिकेच्या स्थायी समितीचा नवा सभापती निवडण्यासाठी पिठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांची नियुक्ती केलेली आहे. महापौर निवडीप्रमाणे यावेळीसुद्धा भाजप सभापती पदासाठी उमेदवार देणार की ही निवडणूक अविरोध होणार हे बघणे औत्सुक्यचे ठरणार आहे.

यापूर्वीचे स्थायी समिती सभापती

वसई विरार महापालिकेत गेल्या दहा वर्षाच्या काळात ८ नगरसेवकांना स्थायी समिती सभापती पदाची संधी मिळाली आहे. हे सर्व सभापती बहुजन विकास आघाडीचेच होते. जितेंद्र शहा आणि नितीन राऊत या दोघांना या पदावर राहण्याची संधी दोन वर्षाच्या कालावधीसाठी मिळाली होती.तर नारायण मानकर, अजीव पाटील, संदेश जाधव, आफिफ शेख, सुदेश चौधरी आणि प्रशांत राऊत यांना सभापती पदावर एका वर्षाच्या कालावधीसाठी विराजमान होता आले होते.

सभापती पदी कोणाची वर्णी?

बहुजन विकास आघाडीकडे बहुमत असल्याने त्यांचाच सभापती होणार हे निश्चित आहे, आणि या पदासाठी माजी महापौर प्रवीण शेट्टी, चंद्रशेखर धुरी, पंकज पाटील, रंजना थालेकर अशा विविध नावांची चर्चा आहे.असे जरी असले तरी ऐनवेळी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडून वेळेवर धक्का तंत्राचा वापर होऊ शकतो, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.