वसई: ​वसई-विरार शहरात दिवसेंदिवस भटक्या श्वानांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन ‘श्वान निर्बीजीकरण केंद्र’ उभारण्याच्या हालचाली पालिकेकडून सुरू करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून लवकरच हे केंद्र कार्यान्वित केले जाणार आहे. या नवीन केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याला १ हजाराहून अधिक श्वानांवर उपचार आणि निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे.

​मागील काही वर्षांपासून वसई-विरार परिसरात भटक्या श्वानांचा त्रास कमालीचा वाढला आहे. सार्वजनिक ठिकाणे, मुख्य रस्ते तसेच निवासी भागांत श्वानांनी लहान मुले व नागरिकांवर जीवघेणे हल्ले केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. चालू वर्षात आतापर्यंत तब्बल ३० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना श्वानदंश झाल्याची नोंद झाली आहे.

​भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रणासाठी महापालिकेने नवघर आणि कशिद-कोपर अशा दोन ठिकाणी निर्बीजीकरण केंद्र सुरू केले होते. मात्र, त्यातील कोपर येथील केंद्र सध्या बंद पडले आहे. त्यामुळे सध्या नवघर येथील एकमेव केंद्रावर संपूर्ण शहराचा भार पडत असून, त्याची क्षमता अपुरी असल्याने निर्बीजीकरणाचा वेग प्रचंड मंदावला आहे. शहरातील श्वानांची संख्या झपाट्याने वाढत असताना अपुऱ्या सोयींमुळे हा उपद्रव कसा रोखणार, असा सवाल लोकप्रतिनिधींनी महासभेतही उपस्थित केला होता.

​या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने तातडीने पुन्हा ‘स्वारस्य अभिव्यक्ती’ निविदा प्रसिद्ध केली होती. या प्रक्रियेत तीन ठेकेदारांनी सहभाग घेतला असून, त्यापैकी एकाची निवड केली जाणार आहे. सध्या संबंधित ठेकेदाराच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे पालिकेने सांगितले. या नवीन व्यवस्थेमुळे दरमहा १ हजाराहून अधिक श्वानांवर उपचार, लसीकरण आणि शस्त्रक्रिया करणे शक्य होईल, असा विश्वास महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे.

​कोपर येथील केंद्र बंद

​विरार पूर्वेकडील कोपर येथे महापालिकेचे निर्बीजीकरण केंद्र एका खासगी संस्थेमार्फत चालवले जात होते. सुमारे १५० श्वानांची क्षमता असलेले हे केंद्र काही तांत्रिक त्रुटींमुळे गेल्या जून महिन्यापासून बंद ठेवण्याचे निर्देश महापालिकेने दिले होते.

​पाच महिन्यांत २७०० श्वानांचे निर्बीजीकरण

​वसई-विरार शहरात वाढत्या श्वानांमुळे श्वानदंशाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. मागील आठ महिन्यांत सुमारे ३७ हजारांहून अधिक जणांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत २,७७६ श्वानांचे निर्बीजीकरण तर २,२८२ श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय श्वानांसंदर्भात आलेल्या १,७३९ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

​भटक्या श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. नवीन निर्बीजीकरण व उपचार केंद्र सुरू करण्यासाठी निविदा अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासोबतच श्वानांसाठी निश्चित खाद्य ठिकाणे ठरवणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करणे या कामांना प्राधान्य दिले जात आहे.:- डॉ. करुणा जुईकर, उपायुक्त (पशूसंवर्धन विभाग,महापालिका)