वसई: करोनामुळे आलेली मरगळ दूर करण्यासाठी पालिकेने वाचनालयांना नवी झळाळी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने १० लाख रुपयांची नवीन पुस्तके पहिल्या टप्प्यात खरेदी केली आहेत. ही पुस्तके पालिकेच्या वाचनालयात विभागून वाटली जाणार आहेत. याशिवाय खासगी वाचनालयांनादेखील नव्याने अनुदान देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

मागील वर्षी २०२० मध्ये करोनाची लागण झाली आणि टाळेबंदी लागू करण्यात आली. यामुळे वाचनालयेदेखील बंद झाली होती. दुसरी लाट ओसरू लागली आणि सर्व व्यवहार सुरळीत सुरू होऊ लागले आहेत. या काळात वाचनालये मात्र दुर्लक्षित झाली होती. त्यामुळे वाचकांना पुन्हा वाचनाकडे वळविण्याचा पालिकेने प्रयत्न सुरू केला आहे. वसई विरार शहरात एकूण १८ वाचनालये आहेत. त्यापैकी नवघर माणिकपूर, वसई पारनाका, तुळींज आणि विरार येथे पालिकेची चार वाचनालये आहेत. उर्वरित १४ ग्रंथालये ही खासगी संस्थांची सार्वजनिक आहे. करोनामुळे वाचनालये बंद असल्याने लोकांच्या वाचनात खंड पडला होता. त्यामुळे वसई विरार महापालिकेने वाचनाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी तसेच नव्या पिढीचा वाचववर्ग जोडण्यासाठी वसई विरारमधील वाचनालये अधिक विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा एक भाग म्हणून वाचनालयात नवीन पुस्तके आणण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १० लाखांची पुस्तके विकत घेण्यात आली आहेत. विविध विषयांवरची ही पुस्तके पालिकेच्या ४ वाचनालयांत विभागून वाटण्यात येणार आहे. पालिकेने त्यांच्या वाचनालय व्यवस्थेसाठी तब्बल ५ कोटी २३ लाख एवढय़ा भरघोस रकमेची तरतूद केली होती. साहित्यिक पुस्तके, नियतकालिकांबरोबर विद्यार्थ्यांना स्पर्धा पुस्तके मिळावी यासाठी पालिकेने सर्व वाचनालयांत राज्य लोकसेवा आयोगाची सर्व पुस्तके उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र करोना सुरू झाल्याने हे काम थंडावले होते. त्या कामालादेखील सुरुवात केली जाणार आहे.

वाचनालयांना पुन्हा अनुदान देण्याचा विचार

लोकांनी अधिकाधिक वाचन करावे, जगभरातील दर्जेदार साहित्य त्यांना उपलब्ध व्हावे यासाठी पालिकेने खासगी ग्रंथालये टिकविण्यावर भर दिला आहे. त्यासाठी सर्व खासगी सार्वजनिक ग्रंथालयांना साहित्यिक आणि पुस्तकी स्वरूपात अनुदान हे अनुदान त्यांच्या श्रेणीनुसार देण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार ‘अ’ दर्जाच्या ग्रंथालयांना दीड लाख रुपये, ‘ब’ वर्गाला १ लाख रुपये, ‘क’ वर्गाला ७५ हजार (पान ३ वर)

वाचनालयांना नवसंजीवनी

आणि ‘ड’ वर्गाच्या ग्रंथालयांना ५० हजार रुपये वार्षिक अनुदान दिले जाणार होते. मात्र मीरा भाईंदरमधील एका प्रकरणामुळे उच्च न्यायालयाने खासगी संस्थांच्या अनुदानावर निर्बंध घातले होते. दरम्यान, करोना आला आणि नंतर पालिकेच्या लोकप्रतिनिधींची मुदत संपल्याने अनुदानाचा विषय मागे पडला. खासगी ग्रंथालयांना अनुदान देण्याचा आम्ही निर्णय यापूर्वीच घेतला आहे. लवकरच निवडणुका झाल्यानंतर आमची कार्यकारिणी येईल आणि आम्ही अनुदान सुरू करू, असे माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी सांगितले. शासनाकडून मिळालेले अनुदान हे तुटपुंजे असल्याने ग्रंथालयाचा दर्जा वाढावा, त्याला शिस्त लागावी यासाठी वसई विरार महापालिकेने अनुदान देण्याचे ठरवले होते, असेही शेट्टी यांनी सांगितले.

शहरातील इतर सार्वजनिक खासगी वाचनालये

वाचनालयाचे नाव                       पुस्तक संख्या               सदस्य

१) चेतना पुस्तकालय, नवाळे                   २४ हजार ५८६        ४९७

२) युवक वाचनालय, भुईगाव                   ११ हजार             २५०

३) मनोहर वाचनालय, माणिकपूर               २७ हजार ५६         ७९३

४) जैन वाचनालय, वासळई                    ११ हजार २५०        १४२

५) दर्यावर्दी वाचनालय, नायगाव               २६ हजार १०५        ५५६

६) सुगंध वाचनालय, उमेळमान                 ५ हजार ४७५         ७३

७) जागृती वाचनालय, वालीव                  ६ हजार ५९९         ११८

८) परस्पर साहाय्यक वाचनालय, गास           ९ हजार ९०१         ३४५

९) संत ज्ञानेश्वर वाचनालय, तुळींज              १२ हजार ५७६        ५२३

१०) ग्रामोन्नती सहकारी, कौलार                 ७ हजरा ८५०          ३४६

११) यंग मेन्स असोसिएशन्स, माणिकपूर         ७ हजार ७३२         ३९०

१२) गीता वाचनालय, विरार                     १९ हजार ९००       १,५००

१३) सार्वजनिक वाचनालय, आगाशी             २१ हजार ७८०       ६०४ 

वसईतील स्थानिक लेखकांना मानाचे स्थान

वसई विरार शहरात अनेक लेखक, कवी आणि साहित्यिक आहेत. त्यांची पुस्तके नियमित प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या पुस्तकांना पालिकेच्या वाचनालयात मानाचे स्थान देण्यात येणार आहे. त्यांची पुस्तके स्वतंत्र कपाटात ठेवली जाणार आहे. स्थानिक साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न असल्याचे पालिकेने सांगितले.

पालिकेच्या वाचनालयांची सध्याची स्थिती

वाचनालये                  एकूण पुस्तके    स्थापना       सदस्य संख्या

नवघर माणिकपूर             ३० हजार       १९८९               ३३२०

वसई                      १६ हजार      १९६७               २६७

विरार                     १६ हजार           १९५१               २५११

सोपार                      ७ हजार             २००९               २८७