विरार : वसई-विरार महापालिकेने शहरात अनेक नवीन उपक्रम राबवत शहराची स्मार्टसिटीकडे वाटचाल करायला सुरुवात केली आहे. यात आता पालिका नव्याने शहरातील विविध भागांत ३०० स्मार्टपोल बसवणार असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

वसई-विरार महानगरपालिकेने शहरात नव्याने दिव्यांची यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात केवळ दिव्यांचे खांब उभे न करता या खांबाचा बहुउद्देशीय वापर करण्याचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी ठरविले आहे. यासाठी पालिका स्मार्टपोल ही संकल्पना घेऊन उतरणार आहे. शहरातील विविध भागांत ३०० स्मार्टपोल उभे रहाणार आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच कामाला सुरुवात केली जाईल असे पालिका आयुक्तांनी सांगितले.

फायदा कसा?

या स्मार्ट पोलचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे, शहरातील अनेक भागांत मोबाइल नेटवर्क मिळत नसल्याने इंटरनेट बुस्टरमुळे नागरिकांना चांगली इंटरनेट सेवा आणि मोबाइल सेवा मिळणार आहे. शहरातील दिवे हे जुन्या पद्धतीचे असून त्यावर वीज अधिक वापरली जाते. यामुळे आता एलएडी दिवे लावले जाणार आहेत. यामुळे रस्त्यांवर अधिक लख्ख प्रकाश पडेल. अधिक चांगल्या चित्र गुणवत्तेचे सीसीटीव्ही कॅमरे लावले गेल्यामुळे पोलिसांना गुन्हे तपासात मदत होईल. डिजिटल जाहिरातींमुळे पालिकेला उपन्न मिळणार आहे. शहरात अनेकवेळा पुराच्या फटक्याने सर्व सेवा बंद पडतात. यावेळी मोबाइल रेडिओने संपर्क साधता येणार आहे. यामुळे हे स्मार्टपोल नागरिकांना अधिक उपयोगी पडतील असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. महानगरपालिका हे पोल खासगी ठेकेदारामार्फत बसविणार असून त्यावर ठेकेदाराला मालमत्ता कर आणि जागेचे भाडेसुद्धा लावणार आहे. यामुळे पालिकेला यातून उपन्नसुद्धा मिळणार आहे.   

स्मार्ट पोलमध्ये काय?

पालिकेने नुकतेच ठेकेदाराला याबाबत सूचना दिल्या आहेत. या पोलमध्ये इंटरनेट बूस्टर, अधिक प्रभावी सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल जाहिरातीचे फलक, दिशादर्शक फलक, आणि मोबाइल रेडिओचासुद्धा वापर केला जाणार आहे.

स्मार्टपोलची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून विविध ठिकाणचे सर्वेक्षणसुद्धा झाले आहे. यामुळे लवकरच कामाला सुरुवात होईल. याचा बहुउद्देशीय वापर केला जाणार असून त्यातून पालिकेला उपन्न मिळणार आहे. प्राथमिक पातळीवर आम्ही ३०० दिवे लावणार आहोत.  – अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका