वसई: वाढते अतिक्रमण, विकासकामात होणारी वृक्षतोड, वातावरणातील बदल अशा विविध कारणांमुळे वसईचा हरित पट्टा नष्ट होऊ लागला आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी यावर्षी महापालिकेने ५० हजार वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत विविध ठिकाणच्या भागात महापालिकेचा पर्यावरण विभाग व सामाजिक संस्था यांच्या मदतीने पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

सध्या विविध प्रकारच्या कारणांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. त्यातच सिमेंट काँक्रिटचे जंगल ही अवती भवती वाढू लागले आहे. तर दुसरीकडे मागील काही वर्षांत वसई विरार शहर हे प्रदूषणाच्या विळख्यात सापडू लागले आहे. तर काही ठिकाणच्या भागात असलेला हरित पट्ट्याच्या ठिकाणी अतिक्रमण वाढू लागले आहे. त्याचा ही मोठा परिणाम हा पर्यावरणावर होत आहे.

तर दुसरीकडे विविध प्रकल्पांच्या कामातही वृक्षांची बेमुसार कत्तल होत आहे. त्यामुळे वृक्षांचे प्रमाण कमी होऊन त्याचा पर्यावरणावर ही विपरीत परिणाम होत आहे.यासाठी मागील काही वर्षांपासून वसई विरार महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे जंगल पट्टा, मुख्य रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत वृक्ष लागवड केली जात आहे. यंदाच्या वर्षी सुद्धा पावसाळ्यात वृक्ष लागवड केली जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. यावर्षी महापालिकेने ५० हजार वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे.

विशेषतः यात देशी प्रजातींची ताम्हण, करंज, बकुळ, बहावा, पुत्रजीवा, पळस, वड,निलमोहर, सुरूंगी, वड, पिंपळ, उंबर, आंबा, जांभूळ, सुरू, रिठा, कांचन, कुडुनिंब, बेल अशा देशी प्रजातीच्या झाडांचा समावेश असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.पावसाळा सुरू झाल्यापासून ठीक ठिकाणी वृक्ष लागवड करण्यास सुरुवात केली असून नुकताच ‘एक कोटी वृक्ष लागवड’ व ‘राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमा’अंतर्गत शहरात विविध ठिकाणी ५ हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. बोळींज येथील क्रीडा संकुलाच्या आरक्षित जागेत वृक्षप्राधिकरण विभाग आणि श्री जीवदानी मंदिर संस्थानच्या संयुक्त विद्यमाने जीवदानी मंदिर परिसरात या वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे.

यावेळी उप-महापौर मार्शल लोपीस, आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी ‘वृक्ष दत्तक योजने’चा लाभ घेत प्रत्येकी एक झाड जगवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.मागील वर्षी महापालिकेने ६५ हजार वृक्षांची लागवड केली होती.

पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठी पालिका सकारात्मक असून शहरात वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन यासारखे उपक्रम हाती घेतले आहे. यावर्षी ५० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार वृक्ष लागवड सुरू असून त्याचे संवर्धन ही केले जात आहे.- स्वाती देशपांडे, उपआयुक्त वृक्ष प्राधिकरण विभाग