वसई: वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या व पाळीव प्राण्यांच्या आरोग्य सुविधेसाठी पालिकेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातील आजारी आणि अपघातात जखमी होणाऱ्या मूक प्राण्यांना वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने महापालिका स्वतःचा सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना उभारणार आहे. या विशेष प्रकल्पासाठी पालिकेने सद्यस्थितीत १ कोटींच्या निधीचे नियोजन केले आहे.

​वसई-विरार उपनगरांचा विस्तार झपाट्याने होत असून, त्यासोबतच पाळीव प्राणी आणि भटक्या प्राण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, संपूर्ण पालिका क्षेत्रात प्राण्यांवर तातडीने उपचार करणारी सक्षम शासकीय यंत्रणा किंवा सुसज्ज रुग्णालय उपलब्ध नसल्याने प्राणीमित्रांना अडचणी निर्माण होत होत्या.

एखाद्या प्राण्याचा अपघात झाल्यास किंवा गंभीर आजार उद्भवल्यास प्राणिप्रेमींना त्यांना थेट मुंबई किंवा ठाण्यातील रुग्णालयात न्यावे लागत होते. प्रवासातील विलंबामुळे अनेकदा प्राण्यांना प्राण गमवावे लागतात. पशु प्राण्यांना वेळेत उपचार करता यावे महापालिकेकडून दवाखाना उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच पार पडलेल्या महासभेत हा प्रस्ताव चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. त्याला सर्व लोकप्रतिनिधींनी एक मताने मंजुरी दिली आहे.

​प्रकल्पाचे स्वरूप आणि नियोजित सुविधा

​महापालिकेने या दवाखान्यासाठी १ कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद केली आहे. जखमी प्राण्यांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यासाठी आधुनिक उपकरणांची व्यवस्था. ​रोजच्या आजारांवर उपचारासाठी बाह्यरुग्ण विभाग, अपघातग्रस्त प्राण्यांना घटनास्थळावरून दवाखान्यात आणण्यासाठी विशेष वाहन व्यवस्था, रस्त्यावरील बेवारस, जखमी श्वान, गाय आणि मांजरींवर या केंद्रात मोफत उपचार केले जाणार आहेत असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

शहरातील जखमी व आजारी प्राण्यांना उपचार मिळावेत यासाठी हा निर्णय घेतला आहे.जागा भाड्याने घ्यायची किंवा नवीन जागा शोधायची याबाबतचे नियोजन सुरू आहे. या दवाखान्यामुळे त् शहरी व ग्रामीण भागातील प्राणीमित्रांना याचा लाभ घेता येणार आहे.

  • अजीव पाटील, महापौर वसई विरार महापालिका