वसई: वसई विरार शहरात कचरा वर्गीकरणाचा प्रश्न गंभीर बनला असताना ओला, सुका आणि संगणकीय कचऱ्याच्या (इ.वेस्ट) वर्गीकरणसाठी पालिकेने पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रक्रियेत नागरिकांनीही सक्रियपणे सहभाग घ्यावा यासाठी, पालिकेने आता गृहनिर्माण संस्थांना साद घातली आहे.

वसई विरार शहरात गेल्या काही काळात वाढती लोकसंख्या आणि कचरा व्यवस्थापनेतील अनियमितता यामुळे शहर कचऱ्याच्या विळख्यात सापडू लागले आहे. त्यातच औद्योगिक वसाहती, आणि खाजगी गृहसंकुलातून निघणाऱ्या कचऱ्याचे स्थानिक स्तरावर न होणारे कचऱ्याचे विलगीकरण यामुळे कचराभूमीत कचऱ्याचे ढीग जमा होऊ लागले आहेत.

वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागातून दैनंदिन जवळपास आठशेहून अधिक मॅट्रिक टन इतका कचरा गोळा होत आहे. यासाठी १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पालिकेने घनकचरा प्रकल्प सुरू केला होता. पण, आता तो प्रकल्पही अवघ्या काही महिन्यात ठप्प झाला आहे. तर दुसरीकडे ओला व सुका कचरा याचे योग्यरित्या वर्गीकरण व्हावे यासाठी ठिकठिकाणी हिरव्या व निळ्या रंगाच्या कचराकुंड्या ही ठेवण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनाही ओला व सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण न करताच सर्व कचरा एकत्रित करून दिला जाऊ लागला आहे. त्यामुळे कचरा विल्हेवाटीचा गंभीर प्रश्न महापालिकेसमोर उभा राहिला आहे.

त्यामुळे आता नागरिकांच्या सहकार्याने शहरातील कचरा विलगीकरण आणि कचरा पुनर्प्रक्रियेचा समस्या मार्गी लावण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिका आणि युनीट्रक मीडिया व वसई तालुका हाऊसिंग फेडरेशन याच्या संयुक्त विद्यामाने कचऱ्याचे व्यवस्थापन व मैलजल व्यवस्थापन या विषयावर नागरिकांसाठी मोफत भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेदरम्यान महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर पार पडणार आहे.

या प्रदर्शनात सुका आणि ओला कचरा आणि संगणकीय कचरा (इ. वेस्ट) असे कचऱ्याचे वर्गीकरण प्रत्येकाने स्वतःच्या घरपासून कसे करावे. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करता येईल. घरात दररोज तयार होणाऱ्या जैविक कचऱ्याचे खतात कसे रुपातर करावे आणि स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरिकांचा असलेली जबाबदारी आणि कर्तव्य याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

तसेच प्रदर्शनामध्ये घनकचरा व्यवस्थापन व मलजल व्यवस्थापन या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कंपन्यांद्वारे कचरा व मलजल प्रक्रियांबाबत विविध तंत्रज्ञानाचे प्रदर्शन मांडण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. सर्व गृहनिर्माण संस्था, घाऊकचरा निर्माते, हॉटेल्स बिल्डर असोसिएशन शैक्षणिक संस्था शाळा व महाविद्यालय धार्मिक संस्था यांनी या विनामूल्य प्रदर्शनात सहभागी व्हावे आणि स्वच्छ शहरासाठी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

१) घाऊक कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांना नोटीसा

घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ व स्वच्छ सर्वेक्षणाच्या मार्गदर्शिकेनुसार कचरा निर्माते आणि १०० किलो किंवा त्यापेक्षा जास्त घाऊक कचरा निर्माण करणाऱ्या संस्था म्हणजे गृहनिर्माण संस्था, हॉटेल किंवा संस्थांनी जागीच कचऱ्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील घाऊक कचरा निर्मात्या संस्थांना नोटीस बजावली आहे. तसेच कचऱ्याचे वर्गीकरण व प्रक्रिया करण्याकरता त्यांना ४५ दिवसांचा कालावधीही देण्यात आला आहे.

२) कचरा प्रक्रियेमुळे मालमत्ता करामध्ये सूट
वसई विरार शहरातील कचरा निर्माते व १०० किलो किंवा त्यापेक्षा जास्त घाऊक कचरा निर्माण करणाऱ्या संस्था म्हणजेच गृहनिर्माण संस्था, हॉटेल, मॉल्स यांनी जागीच कचऱ्यावर प्रक्रिया केल्यास त्यांना पालिकेकडून मालमत्ता करात पाच टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.

यापूर्वी पाच ते सहा वर्षांपूर्वी महापालिकेने गृहसंकुलांना ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात यावे यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता दूत व पालिकेचे इतर कर्मचारी गृह संकुलात जाऊन नागरिकांची बैठक घेतली होती. यावेळी केवळ ३० गृह संकुलांनी पुढाकार घेतला होता.