वसई:- वसई विरार महापालिकेच्या ९ प्रभाग समित्यांची रचना सभापतीपदी निवड दहा महिन्यांपासून रखडली आहे. निवडीला होत असलेल्या विलंबाची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली असून कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांना प्रभाग समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी योग्य पीठासीन अधिकाऱ्याची नियुक्ती करून एका आठवड्याच्या आत योग्य निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मा. न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि मा. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठा समोर ही सुनावणी घेण्यात आली होती.
जानेवारी २०२६ मध्ये वसई-विरार महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीनंतर, २० मार्च २०२६ रोजी झालेल्या महासभेत सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने (बविआ) प्रभाग फेररचनेचा प्रस्ताव मंजूर केला. मात्र, या नव्या रचनेमुळे ९ पैकी ८ प्रभाग समित्यांवर बविआचे वर्चस्व प्रस्थापित होण्याची शक्यता असल्याने, भाजपने आणि आमदार राजन नाईक यांनी यास तीव्र विरोध दर्शवला. जुन्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका व्हाव्यात, अशी मागणी करत हा विषय राज्य शासनाकडे नेण्यात आला. वाद वाढल्यामुळे कोकण विभागीय आयुक्तांनी २५ मार्च २०२६ रोजी पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती, २७ मार्च २०२६ रोजी प्रशासकीय कारणे पुढे करत तडकाफडकी रद्द केली होती.
यानंतर प्रभाग रचना व सभापती निवड याबाबत निर्णयच होत नसल्याने महापौर अजीव पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी, प्रभागांच्या सीमा व रचनेबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यावर राज्य सरकारचे निर्देश प्रलंबित असल्याने दिरंगाई झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, या मुद्यांमुळे प्रभाग समित्या स्थापन करण्याच्या प्रक्रियेत आणि पीठासीन अधिकाऱ्याच्या नियुक्तीमध्ये विलंब करणे योग्य ठरणार नसल्याचे स्पष्ट केले.
न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश
मा. न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि मा. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, कायद्यातील तरतुदीनुसार प्रभाग समित्यांची स्थापना करणे अनिवार्य आहे. न्यायालयाने कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांना तातडीने कार्यवाही करत एका आठवड्यात नवीन पीठासीन अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी ठेवण्यात आली आहे.
सुनावणीकडे सर्वांचे लक्ष
वसई विरार शहर महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडणूकांबाबत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने २८ ऑक्टोबर रोजी पालिकेने तयार करण्यात आलेली नवीन प्रभाग रचनेचा प्रस्ताव निलंबित करण्यात आला होता. मात्र या प्रकरणी महापौर अजीव पाटील यांनी रखडलेल्या प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणूका लवकर घेण्यासाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यावर २६ ऑक्टोबर झालेल्या सुनावणीत या निवडणुकीबाबत एका आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश आणि पुढील सुनावणी ४ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे नमूद केले होते. याबाबतची लेखी न्यायालयातर्फे हे आदेश २ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाले. त्यामुळे या निवडणुकीबाबत पेच निर्माण झाला असून पुढे ४ नोव्हेंबर म्हणजेच आज होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
