वसई: वसई विरार शहरात महापालिकेची घनकचरा विल्हेवाट प्रक्रियेचा घोटाळा चांगलाच गाजत असताना दुसरीकडे शहराच्या स्वच्छतेसाठी पाच वर्षासाठी काढण्यात आलेली ९५७ कोटींची निविदा ही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. संशयास्पद निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करून ती रद्द करण्याबाबतचा विषय सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी ठेवला होता. मात्र चर्चा सुरू होण्याआधीच स्थगित करण्यात आला आहे. विशेषतः सलग दुसऱ्यांदा हा प्रस्ताव स्थिगित करण्यात आला आहे.
महापालिकेच्या घनकचरा विभागातर्फे दैनंदिन रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची सफाई, गटार चेंबर सफाई करणे, घरोघरी जाऊन कचरा उचलणे आणि तो कचराभूमीवर नेऊन टाकणे अशा विविध कामांसाठी ठेका दिला जातो. यापूर्वी सदर कामासाठी ठेका दिलेल्या ठेकेदारांची मुदत गेल्या वर्षीच संपली होती. त्यामुळे तब्बल तीन वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. तर तिसऱ्या वेळी प्रभागनिहाय निविदा काढून २०२५- २६ ते २०३०-३१ या पाच वर्षांसाठी मे.अमृत एंटरप्रायजेस, आर एन बी इन्फ्रा प्रा. लि आणि क्रिस्टल इंटरग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड या तीन ठेकेदारांना ९५७.६४ कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे.
मात्र निविदा प्रशासनाने घाईघाईत काढल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे या निविदेची चौकशी व्हावी अशी मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार यापूर्वी ३१ ऑगस्ट २०२६ रोजीच्या सर्वसाधारण सभेतही निविदा प्रक्रियेबाबत सखोल चौकशी करून रद्द करण्यात बाबत प्रस्ताव ठेवला होता. तेव्हा या प्रस्तावाला महापौरांनी स्थगिती देत अभिप्राय नोंदविण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यानंतर नुकताच पार पडलेल्या महासभेत पुन्हा एकदा प्रस्ताव चर्चेसाठी आणला होता. मात्र, महापौर अजीव पाटील यांनी या विषयावर सविस्तर चर्चा आणि कायदेशीर पडताळणी होणे आवश्यक असल्याचे सांगत हा विषय स्थगित ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. घाईघाईत ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला, तर महानगरपालिकेला काही कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या विषयावर सविस्तर अहवाल मागवण्यात आला असून, सर्व बाबींची पडताळणी केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.
