वसई: कचरा संकलकांनी कचरा गोळा करून त्याची वाहतूक करताना वाहनावर ताडपत्री किंवा प्लास्टिकचे आच्छादन घालणे बंधनकारक असताना वसई विरारमधील ठेकेदारांकडून या नियमांना हरताळ फासला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवर आच्छादन नसल्यामुळे गाडीतील कचरा रस्त्यावर पडून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे अशा निष्काळजी ठेकेदारांवर करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वसई विरार शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत सुसूत्रता यावी आणि शहर अधिक स्वच्छ राहावे. या दृष्टीने वसई विरार महापालिकेकडून दैनंदिन रस्ते सफाई, गटार सफाई, वर्गीकृत आणि विलगीकृत कचरा संकलन करणे व संकलित कचऱ्याची कचरा भूमीपर्यंत वाहतूक करणे यासाठी त्रिवार्षिक निविदा काढण्यात आली होती. तसेच या कंत्राटाचे वेगळेपण म्हणजे सर्व प्रभागांची एकच निविदा न काढता, पालिकेने ९ प्रभागांच्या स्वतंत्र निविदा काढल्या होत्या. मात्र, त्यानंतरही कचरा वाहतूकीसाठी घालून देण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन ठेकेदारांकडून केले जात आहे.
कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांवर आच्छादन नसल्यामुळे गोळा केलेला कचरा पुन्हा रस्त्यावर पडून परिसर अस्वच्छ होऊ लागले आहेत. तसेच गोखिवरे, भोयदापाडा या कचराभूमीच्या नजीकच्या परिसरांना ठेकेदारांच्या निष्काळजीपणाचा सर्वाधिक फटका बसत आहे. मुख्य रस्ते, स्थनिक रहिवाशांच्या घरासमोरील आवारात कचरा साचून राहत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधी आणि माशा व डासांच्या प्रादुर्भावाला सामोरे जावे लागत आहे.
ऐन पावसाळ्यातही कचऱ्याची उघड्या वाहनांतून वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे, कचरा झाकण्यासाठी लागणाऱ्या ताडपत्रीचा खर्च महापालिकेकडून दिला जात असतानाही ठेकेदारांचा हा मनमानी कारभार सुरूच आहे. या गंभीर प्रकाराकडे स्वच्छता विभागाचे उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच स्वच्छता निरीक्षकांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख काकासाहेब मोटे यांनी केला आहे. तसेच लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही मोटे यांनी केली आहे.
