वसई: वसई विरार शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रकल्पांची कामे मार्गी लागावी यासाठी महापालिकेकडून कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. प्रामुख्याने शहरात पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि जलवाहिन्यांचे जाळे विस्तारण्यासाठी जागतिक बँकेकडून अर्थसाहाय्य मिळावे यासाठी महापालिका प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांनी स्पष्ट केले आहे.
वसई-विरार महापालिका क्षेत्राचा विस्तार वेगाने होत आहे. मात्र अजूनही विविध प्रकारच्या पायाभूत सोयीसुविधा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध झाल्या नाहीत. याशिवाय जे काही प्रकल्प प्रस्तावित केले आहेत ते उभारण्यासाठी निधी सुद्धा अपुरा पडत आहे. यासाठी आता जागतिक बँकेतून कर्ज घेऊन शहरांतील रखडलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
यात प्रामुख्याने शहराच्या पुढील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. यात जलवाहिन्यांचे जाळे शेवटच्या टोकापर्यंत आणि नव्याने विकसित होणाऱ्या भागात पाणी पोहोचवण्यासाठी नवीन मुख्य व वितरण जलवाहिन्या अंथरणे या कामांचा समावेश आहे. तर शहरात आजही मोठ्या प्रमाणात पाणी प्रक्रियेविनाच समुद्रात सोडले जात आहे. याच अनुषंगाने शहरात ठिकठिकाणी आधुनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी करता येणार आहे.
पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्या आणि इतर नागरी सुधारणा करणे अशी कामे मार्गी लावली जाणार आहेत.यासाठी जागतिक बँकेतून कर्ज मिळावे यासाठी पूल बॉण्ड मधून ३०० कोटी व तर सांडपाणी प्रकल्पासाठी जो प्रोग्रॅम आहे त्यातून २०० कोटी व अन्य योजना यातून असे सुमारे १ हजार कोटींपर्यँतचे सहकार्य मिळावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी दिली आहे.
‘भांडवली गुंतवणूक आराखडा’ तयार करणार
परिसराचा वाढता विस्तार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महापालिकेकडून पएक सर्वसमावेशक ‘भांडवली गुंतवणूक आराखडा’ तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यामुळे आगामी काळात होणाऱ्या मोठ्या विकासकामांना गती मिळणार असून, निधीचे अचूक नियोजन करणे प्रशासनाला शक्य होणार आहे. यात प्रामुख्याने रिंगरोड, उड्डाणपूल, पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या मोठे प्रकल्प राबविले जाणार असून
पुढील ५ ते १० वर्षांतील लोकसंख्या आणि नागरीकरण लक्षात घेऊन प्रकल्पांची आखणी केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. विशेषतः प्रकल्पांसाठी लागणारा निधी केंद्र सरकार, राज्य सरकार, जागतिक बँक यांच्यामार्फत उभा केला जाणार आहे.
खोलसापाडा धरणाच्या प्रकल्पाला गती मिळणार
शहरातील पाण्याची समस्या लक्षात घेता खोलसापाडा १ व २ हे धरण प्रकल्प ही नियोजित केले असून त्यांचे कामही सुरू आहेत. या दोन्ही धरणातून शहराला सुमारे ७० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा होणार आहे. यासाठी मोठ्या प्रेम6 निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे जागतिक बँक कर्ज, अर्बन चॅलेंज फंड या निधीतून ही कामे मार्गी लावली जाणार आहेत.
शहरातील प्रमुख प्रकल्पांच्या कामाला गती मिळावी यासाठी जागतिक बँकेतून अर्थसाहाय्य मिळावे यासाठी आमची चर्चा सुरू आहे. त्यातून निधी उपलब्ध होताच टप्प्या टप्प्याने विकास कामे मार्गी लावली जातील.- पृथ्वीराज. बी पी. आयुक्त वसई विरार महापालिका.
