वसई: महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या जिल्हापरिषद शाळा विनामूल्य महापालिकेला हस्तांतरण करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अजूनही याबाबतचा शासन निर्णय जारी न झाल्याने हस्तांतरण प्रक्रिया थांबली आहे. या हस्तांतरण प्रक्रियेला गती देऊन हा शासन निर्णय पारित करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहे.
शाळा हे महापालिकांचे मूलूभत कर्तव्य असले तरी वसई विरार महापालिकेच्या मालकीची एकही शाळा नाही. दुसरीकडे शाळा नसताना शिक्षण कर वसुल केला जात होता. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना होती. जागेची अडचण, शिक्षण मंडळ अशा अडचणीमुळे पालिकेला शाळा सुरू करता येत नव्हती. जिल्हा परिषदेच्या दोनशेहून अधिक शाळा शहरात आहेत.
विशेषतः गोर गरीब व ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने या शाळा अत्यंत महत्वाच्या आहेत. सद्यस्थितीत केवळ जिल्हा परिषदेच्या १९२ शाळा उरल्या आहेत. यातील पालिकेच्या कार्यक्षेत्रात ११६ शाळा येत आहेत. मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांकडे शासनाने लक्ष न दिल्याने अनेक भागातील शाळांची अवस्था फारच बिकट बनली आहे. या जिल्हा परिषद शाळा हस्तांतरित करून विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू करण्यात आले होते.
मात्र विविध कारणांमुळे ही प्रक्रिया रखडली होती. जुलै २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या विशेषतः बैठकीत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा महापालिकेकडे विनामूल्य हस्तांतरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. याशिवाय शाळांसाठी पाच वर्षे ८० टक्के शासन अनुदान देईल अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र या घोषणेनंतर शासन निर्णय आदेश काढला नसल्याने हस्तांतरण प्रक्रिया थांबली आहे.
नुकताच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विरार नारिंगी उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी विरार येथे आले होते. यावेळी त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासावर भाष्य करीत असताना जिल्हा परिषदेच्या शाळेकडे ही लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले. अजूनही हस्तांतरण करण्याचा शासन निर्णय प्राप्त झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या हस्तांतरण प्रक्रियेला गती मिळावी याबाबतचा शासन निर्णय लवकर जारी व्हावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहे.
पावसाळ्या पूर्वी शाळांची स्वच्छता करा
मे महिना असल्याने शाळांना सुट्ट्या पडल्या आहेत. त्यामुळे या सर्व शाळांचे वर्ग बंद आहेत. या बंद वर्गात धूळ, याशिवाय अस्वच्छता निर्माण होत असते. काहीवेळा साप ही घुसतात. यासाठी जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शाळा सुरू होण्या आधीच जिल्हा परिषदेच्या शाळांची स्वच्छता करण्यात यावी अशा सूचना पालकमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
