वसई: वसई विरार शहरात आज महापालिका निवडणुकीसाठी मतदान केले जात आहे. त्यामुळे विविध प्रभागातील मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या असून मोठ्या उत्साहात वसईत मतदानाला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. वसई विरार महापालिकेचा २०२० साली कार्यकाळ संपल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी महापालिका निवडणूक पार पडत आहे.
२९ प्रभागात ११५ जागांसाठी ५४७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर आज (१५ जानेवारी) या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहेत. मतदान प्रक्रियेसाठी महापालिका प्रशासनाकडून शहरात १ हजार ३३५ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. तर, या केंद्रांवर ११ लाख २६ हजार ४०० मतदार मतदान करणार आहेत.
मतदानासाठी आवश्यक मतपेट्या, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट मशिन नऊ प्रभागात तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममधून बुधवारी वितरीत करण्यात आले आहेत. यात १ हजार ८०० कंट्रोल युनिट, ४ हजार ३०० व्हीव्हीपॅट यंत्र, शाई व मतदान प्रक्रियेसाठी लागणारे अन्य साहित्य, झोनल अधिकारी व निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना वितरित करून कडक पोलीस बंदोबस्तात वाहनांद्वारे नियोजित मतदान केंद्रावर पोहचवण्यात आले आहेत.
आज सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे. प्रशासनाने शासकीय, निमशासकीय, बँका अशा आस्थापनांना सुट्टी जरी जाहीर केली असली तरी काही ठिकाणी कामावर जाणारे किंवा सकाळच्या सत्रात मतदान करून सुट्टीचा आनंद घेऊ पाहणाऱ्या नागरिकांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली आहे. मतदान सुरू होण्यापूर्वीच मतदारांच्या लांबच लांब रांगा मतदान केंद्राबाहेर लागल्याचे दिसून आले.
मतदारांना आयुक्तांचे आव्हान
१५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेली अंतिम मतदार यादी मतदानासाठी ग्राह्य धरली जाईल. ज्यांची नावे १ जुलै २०२५ पर्यंतच्या यादीत आहेत, त्यांनाच मतदानाचा हक्क बजावता येईल. एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या केंद्रांवर असू शकतात, कारण ही नावे विधानसभा यादीवर आधारित असतात. मतदारांनी मतदानाला जाण्यापूर्वी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव, अनुक्रमांक आणि मतदान केंद्राची माहिती तपासून घ्यावी, जेणेकरून गोंधळ टाळता येईल, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.
