वसई: वसई-विरार शहर महापालिकेच्या रुग्णालयातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णावर दोन तरुणांनी आत घुसून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पालिका रुग्णालयांमधील रुग्णांची सुरक्षितता आणि तेथील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिमेकडील समेळपाडा येथील महापालिकेच्या ‘सोपारा रुग्णालयात’ शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. कलीम खान शेख (२६) असे मारहाणीत जखमी झालेल्या रुग्णाचे नाव आहे. ताप येत असल्याने त्याला २८ तारखेला उपचारासाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.​घटनेच्या दिवशी कलीमचे त्याच्या पत्नीसोबत भांडण झाले होते. या वादातून रागाच्या भरात कलीमने पत्नीचा मोबाईल फोन जमिनीवर आदळला. पत्नीने या घटनेची माहिती आपल्या भावांना दिली. त्यानंतर संतापलेल्या भावांनी मध्यरात्री थेट रुग्णालयात गाठून कलीमवर हल्ला चढवला.

​सुरक्षा रक्षकाने त्यांना सुरुवातीला अडवण्याचा प्रयत्न केला असता,आम्हाला आमच्या रुग्णाला पाहायचे आहे असे सांगून पत्नी व तिच्या दोन भावांनी आत प्रवेश केला, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. आत शिरताच दोन्ही तरुणांनी बेडवर झोपलेल्या कलीमला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

या मारहाणीची ही संपूर्ण घटना रुग्णालयात उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून पालिका रुग्णालयात रुग्णांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेबाबत आम्ही नालासोपारा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असल्याचे सोपारा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ गौरव वाघ यांनी सांगितले.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने याची तातडीने दखल घेत एनसी दाखल केली आहे. याचा पुढील तपास सुरू आहे असे नालासोपारा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल मुंढे यांनी सांगितले.