वसई: वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळावी म्हणून वसई विरार महापालिकेने जागोजागी गतिरोधक तयार केले आहेत. मात्र, गतिरोधक लक्षात यावा यासाठी त्यावर मारण्यात आलेले पांढरे पट्टेच आता गायब झाल्यामुळे वाहनचालकांवर जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ आली आहे.

शहरातील वाहनांची वाढती वर्दळ लक्षात घेत महापालिकेकडून मुख्य तसेच जोडरस्त्यांवर गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. तसेच वाहनचालकांना हे गतिरोधक स्पष्ट दिसावेत यासाठी त्यावर चुना पावडरीच्या साहाय्याने पांढरे पट्टे अर्थात मार्गदर्शक पट्टे मारण्यात आले होते. पण, पावसाला, अवजड वाहनाची वर्दळ, सततची रस्ते दुरुस्ती यामुळे गतिरोधकांवरील पांढरे पट्टे आता पुसट झाले आहेत. तर काही ठिकाणचे पांढरे पट्टे नाहीसे झाले आहेत. त्यामुळे पहाटे तसेच रात्रीच्या वेळी अंधाऱ्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी गतिरोधकच धोकादायक ठरू लागले आहेत.

शहरातील रुग्णालय, शाळा, रस्ते दुभाजक असणाऱ्या भागांत वसई विरार महानगरपालिकेने गतिरोधक बसवले आहेत. मात्र गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्यामुळे अचानक समोर येणाऱ्या गतिरोधकामुळे चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते आणि वाहन गतिरोधकावर कोलमडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

तर काही ठिकाणी गतिरोधक झिजल्यामुळे वाहनचालक थेट तुटलेल्या गतिरोधकांमधून गाड्या काढत आहेत. यामुळे वर्दळीच्या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महापालिकेने तुटलेले गतिरोधक दुरुस्त करावेत तसेच गतिरोधकांवर पांढरे मार्गदर्शक पट्टे मारावेत, अशी मागणी केली जात आहे. शहरात रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. गतीरोधकांना पांढरे मार्गदर्शक पट्टे मारावेत अशा सूचना केल्या जातील असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

नियमांची पायमल्ली

गतिरोधकाची उंची दहा सेंटिमीटर आणि लांबी साडेतीन मीटर असणे आवश्यक आहे. तसेच वाहनचालकांना गतिरोधक असल्याची सूचना मिळण्यासाठी चाळीस मीटर अंतरावर सूचना फलक असावा, असाही नियम आहे. तर नवा गतिरोधक तयार करताना वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच गतिरोधकावर थर्मोप्लॅस्टिक पेंटने तयार केलेल्या पट्ट्या असाव्यात असा नियम आहे. परंतु काही ठिकाणी नियमांची पायमल्ली करून गतिरोधक तयार करण्यात आले आहेत, अशा तक्रारी आहेत.