वसई:- वसई विरार शहरात परिवहन सेवेच्या बस फेऱ्यात वाढ करण्यात यावी अशी मागणी सातत्याने प्रवासी करीत आहेत. मात्र, बसच्या अपुऱ्या संख्येमुळे बस वाढविणे शक्य होत नाही. महापालिकेला पंतप्रधान अनुदान योजनेतून शंभर ई-बस दिल्या जाणार आहेत. परंतु या ई-बस एप्रिलमध्ये उपलब्ध होणार असल्यामुळे परिवहनच्या वाढीव बसेसची प्रवाशांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.
वसई विरार शहरात पालिकेच्या परिवहन विभागाकडून सेवा दिली जात आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात ११४ बसेस असून त्यांच्या मार्फत ३६ मार्गावर ही सेवा दिली जाते. दररोज या बसेस मधून हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. शहाराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही प्रचंड वाढू लागली आहे. सकाळ व संध्याकाळच्या सुमारास नोकरदार प्रवाशांची मोठी गर्दी बसमध्ये असते. या वाढत्या गर्दीमुळे अनेक बस क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहेत.
काही ठिकाणी रिक्षा ही वेळेत मिळत नाही अशा ठिकाणी ही प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. जर पुरेशा बस असतील त्यांचा फायदा प्रवाशांना होईल. यासाठी प्रवासी बसेसच्या संख्येत वाढ करण्यात यावी, अशी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. महापालिकेने मागील दोन वर्षांपासून ई-बस सेवा वाढविण्यावर भर दिला आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या ४० ई बस आहेत. तर केंद्र शासनाच्या पंतप्रधान अनुदान योजनेतून आणखीन १०० ई-बस देण्याचे नियोजन केले आहे.
त्यासाठीचा प्रस्ताव ही महापालिकेने शासन स्तरावर दिला आहे. मात्र, अजूनही या बस उपलब्ध न झाल्याने उपलब्ध बसेसच्या माध्यमातून महापालिकेला परिवहन सेवा द्यावी लागत आहे.
एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यँत या ई-बस उपलब्ध होतील, अशी माहिती महापालिकेच्या परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.
ई-बस आगारांचे ७० टक्के काम पूर्ण
वसईच्या नवघर व नालासोपारा या ठिकाणी नवीन आगार उभारण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. नालासोपारा आगारात ४० बस तर नवघर आगारात ६० बस उभ्या राहू शकतील असे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी २७.१७ कोटींचा निधी खर्च करण्यात येत आहे. आतापर्यंत दोन्ही आगारांचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण केले जाईल, असे महापालिकेने सांगितले आहे. ई-बस जरी दाखल होत असल्या तरी चार्जिंग केंद्राचा मोठा अभाव दिसून येत आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या मुख्यालयाच्या मागील भागात केवळ एकच चार्जिंग केंद्र आहे. त्यामुळे नव्याने तयार होणाऱ्या नालासोपारा आगारात ८ चार्जिंग स्विच तर नवघर आगारात १२ चार्जिंग स्वीच अशी एकूण २० स्वीचिंग केंद्र तयार केली जाणार आहेत.
बस फेऱ्या वाढविण्यावर भर
परिवहन विभागाकडून प्रवाशांना चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यावर महापालिकेचा भर आहे. सद्यस्थितीत दिवसाला २ हजार २०० फेऱ्या होत असतात. जेव्हा बसची संख्या वाढेल तेव्हा ज्या भागात बस फेऱ्या अपुऱ्या आहेत तेथे प्राधान्याने ही सेवा सुरू केली जाईल, असे परिवहन व्यवस्थापक धैर्यशील जाधव यांनी सांगितले आहे. याशिवाय ज्या काही परिवहनच्या सवलत योजना आहेत त्यांचा ही लाभ दिला जात आहे.त्यातही पारदर्शकता आणण्यासाठी स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

