वसई:- वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी गेल्या पाच दिवसांपासून पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी महापौर व अधिकारी यांच्या झालेल्या पाच ते सहा तास झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेतला. त्यामुळे पाच दिवसापासून बंद असलेली परिवहन सेवा गुरुवार पासून पूर्ववत करण्यात आली आहे.
कंत्राटदाराकडून वेळेवर आणि पुरेसे वेतन न मिळणे, तसेच वेतनातून केली जाणारी बेकायदेशीर कपात यांमुळे त्रस्त झालेल्या बस चालक आणि वाहकांनी शनिवारपासून अचानक ‘काम बंद’ आंदोलन पुकारले होते. या संपामुळे महापालिकेच्या ३६ मार्गांवरील बस सेवा पूर्णपणे कोलमडली होती, ज्यामुळे हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
सुरुवातीला महापालिका अधिकारी, कंत्राटदार आणि कामगार प्रतिनिधी यांच्यात दोन ते तीन टप्प्यांत बैठका झाल्या; मात्र, मागण्यांबाबत लेखी आश्वासन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी पाचव्या दिवशीही आंदोलन तीव्र ठेवले होते. नागरिकांची वाढती गैरसोय लक्षात घेता, बुधवारी सायंकाळी महापौर अजीव पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, सभागृह नेते प्रफुल्ल साने, परिवहन व्यवस्थापक धैर्यशील जाधव, एसएनएन परिवहन कंपनीचे संचालक आणि युनियन प्रतिनिधी यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जवळपास पाच ते सहा तास चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर या वादावर तोडगा निघाला.
कंत्राटदार कंपनीने कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, थकीत राहिलेले वेतन आणि इतर कायदेशीर लाभ देण्याबाबतच्या मागण्यांना लेखी तत्त्वतः मान्यता दिली. त्याच वेळी, दोन्ही बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने गुरुवारी सकाळपासून सर्व मार्गांवर बस सेवा सुरळीत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून वेतनात वाढ न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. या निर्णयाबाबत बोलताना स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांनी सांगितले की, प्रवाशांचे हाल थांबवण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू होते.
कंत्राटदार आणि कर्मचारी यांच्यात यशस्वी चर्चा झाल्याने गुरुवारपासून सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. तर स्थानिक कामगार संघाचे उपाध्यक्ष किरण खराते यांनी सांगितले की, मुख्य मागण्या लेखी स्वरूपात मान्य झाल्यामुळे संप मागे घेण्यात आला असून १७ सप्टेंबरच्या सकाळपासून बस सेवा सुरू झाली आहे. याशिवाय संपाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल कामगार संघ शिष्टमंडळाने क्षमा मागितली आहे. संप मागे घेतल्याने वसई-विरारमधील दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
