वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत कार्यरत चालक, वाहक, परिचालक, तंत्रज्ञ आणि इतर कामगार-कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे सकाळपासून वसई-विरार शहरातील रस्त्यांवर मनपा परिवहन सेवेची एकही बस धावली नाही. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे.

वसई विरार शहरात पालिकेच्या परिवहन विभागाकडून बस सेवा पुरविली जाते. सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात ११४ बसेस असून ३६ मार्गावर ही सेवा दिली जात आहे. तसेच ४० ईबसचा समावेश आहे. दररोज बसेस मधून ६० ते ६५ हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र परिवहनसेवेत काम करणारे चालक व वाहक यांच्या वेळेत वेतन आणि वेतन वाढ यासह इतर सुविधा मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याने अखेर संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अचानकपणे संप पुकारला आहे. त्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासून पालिकेची परिवहनसेवा ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले.

विरार आगार आणि सातीवली आगारात या सर्व बसेस उभ्या असल्याचे चित्र दिसून आले आहे. बससेवा बंद असल्यामुळे कामावर जाणाऱ्या हजारो प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

परिवहन कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये इतर शहरांतील महापालिका परिवहन सेवांच्या धर्तीवर वेतन लागू करणे, कायद्यानुसार ओव्हरटाईम देणे, कामाच्या तासांमध्ये आवश्यक विश्रांतीसह वेळ निश्चित करणे आणि सुरू असलेली ब्लूम ठेका पद्धत हटवणे, यांचा समावेश आहे. याशिवाय बोनस, ग्रॅज्युइटी, अनामत रक्कम परत करणे तसेच कर्मचाऱ्यांवरील कथित मनमानी आर्थिक दंड आणि कारवाईच्या मुद्द्यावरही कामगारांनी आक्षेप घेतला आहे.