वसई:- वसई-विरार महापालिका परिवहन सेवेच्या ढिसाळ कारभारावर नेहमीच टीका होत असते. मात्र, सध्या समाज माध्यमांवर एक भलताच व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, थेट आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी येथे धावणाऱ्या बसवर ‘वसई-विरार महानगरपालिका परिवहन सेवा’ असा नामफलक झळकत असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार पाहून तेथे देवदर्शनासाठी गेलेल्या वसईकरांना आश्चर्याचा धक्का बसला असून, नेटकऱ्यांनी यावर मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.
वसईचे पत्रकार मनिष म्हात्रे व त्यांचे सहकारी ४ जुलै रोजी तिरुपती बालाजी दर्शनासाठी गेले होते. ६ जुलै रोजी तिरुमला येथून खाली शहरात येण्यासाठी त्यांनी एका वातानुकूलित इलेक्ट्रिक बसमध्ये प्रवेश केला. या बसमधील ड्रायव्हर सीटच्या मागे असलेल्या इलेक्ट्रॉनिक नामफलकावर सतत ‘वसई विरार महानगरपालिका परिवहन सेवा’ असा उल्लेख होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही बस वसई-विरारमध्ये धावणाऱ्या ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड’ कंपनीच्या बससारखीच होती. म्हात्रे यांनी तात्काळ याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली आहे. बसचे रि-इन्स्पेक्शन कोडिंग करताना त्यांच्याकडून चुकून तिरुपती येथील एका बसचे कोडिंगही वसई-विरारच्या डेटासह अपडेट यामुळे तिरुपतीच्या बसमध्ये हा फलक दिसू लागला असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाशी संपर्क केला असता. संबंधित व्हिडिओची सत्यता पडताळून, तिरुपती येथील बसमध्ये ‘वसई-विरार महानगरपालिका परिवहन सेवा’ असा उल्लेख कसा झाला, याचा लेखी खुलासा संबंधित ऑलेक्ट्रा कंपनीकडून मागवण्यात आला आहे त्यानंतर कारण अधिक स्पष्ट होईल असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.
नेटकऱ्यांकडून मजेशीर प्रतिक्रिया
हा व्हिडिओ रातोरात व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी पालिकेची फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे. “वसईत धड बस सेवा देऊ शकत नाही, पण थेट तिरुपतीला बस पाठवली,” असा टोला नेटकऱ्यांनी लगावला आहे. सोशल मीडियावर खालीलप्रमाणे मजेशीर कमेंट्स येत आहेत:
”आप्पाचा विषय लय हार्ड आहे… वसई विरार बस सेवा तुमच्यासाठी कुठे पण!”
”आमची वसईची बस आम्हाला परत करा, बस पावसाला घाबरून तिरुपतीला गेली.”
”हा नक्की एखादा वसईकर आयटी वाला असणार, ज्याने हे हॅक केलंय.”
”वसई – तिरुपती बस व्हाया वज्रेश्वरी!”
