वसई: नालासोपारा पूर्वेतील संतोष भुवन आणि वालईपाडा परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या अघोषित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या संयमाचा अखेर बांध फुटला आहे. रविवारी संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून महावितरण आणि प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने करत आंदोलन छेडले. परिसरात नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा अशी आक्रमक मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून महावितरणने यावर तातडीने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वसई-विरार शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. भरदिवसा आणि विशेषतः रात्री-अपरात्री अचानक वीज गायब होत असल्याने नागरिक अक्षरशः वैतागले आहेत. कधी ट्रान्सफॉर्मर जळणे, तर कधी वीज वाहिन्यांमध्ये बिघाड (केबल ब्रेक) होणे अशा कारणांमुळे दिवसातून अनेकदा तासन् तास वीज गायब असते. काही दिवसांपूर्वी शहरात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे सलग तीन ते चार दिवस संपूर्ण शहर अंधारात होते. पूर ओसरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यानंतरही विजेचा हा लपंडाव अविरत सुरूच असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
विजेच्या या अनिश्चिततेमुळे केवळ अंधाराचाच नाही, तर इतरही गंभीर समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अनेकदा वीज पूर्णपणे जात नसली तरी अधूनमधून कमी-जास्त (डिम) दाबाने पुरवठा होतो. यामुळे घरातील टीव्ही, फ्रिज, पंखे आणि एसी यांसारखी महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे ही समस्या केवळ नालासोपारापुरती मर्यादित राहिलेली नसून वसई, नायगाव पूर्व आणि विरार शहराच्या विविध भागांतही वीज समस्या गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या कारभारावर नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन ग्राहकांना दिलासा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
