वसई: नालासोपाऱ्यातील मजेठिया येथे गेल्या अनेक वर्षांपासून नाट्यगृहाचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी १० जूनची मुदत देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे नाट्यगृहाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे नागरिकांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वसई विरार शहर हे सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखले जाते. साहित्य संमेलने, व्याख्याने, पुस्तक प्रकाशन सोहळा, नाट्यप्रयोग, कवी संमेलने अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन शहरात करण्यात येत असते. त्यामुळे नागरिकांना प्रशस्त अशा नाट्यगृहाची गरज आहे. मात्र, शहरात महापालिकेचा नाट्यगृह उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक कलाकारांना आणि सांस्कृतिक संस्थांना खासगी सभागृहे किंवा महाविद्यालयांच्या हॉलवर अवलंबून राहावे लागत आहे.

या खासगी जागांचे भाडे परवडत नसल्याने अनेकदा नियोजित कार्यक्रम रद्द करावे लागतात. तसेच व्यावसायिक नाटकांचे प्रयोग करण्यासाठी मुंबई-पुण्यातील नाट्य संयोजक वसईत येण्यास कचरतात. परिणामी, वसईकर रसिकांना चांगल्या नाटकांचे प्रयोग पाहण्यासाठी थेट मुंबई किंवा ठाणे गाठावे लागत आहे.

त्यामुळे वसई तालुक्यात हक्काचे नाट्यगृह व्हावे, अशी मागणी स्थानिक रंगकर्मी आणि रसिकांनी गेली अनेक वर्षे लावून धरली होती. या मागणीची दखल घेत वसई-विरार महापालिकेने नालासोपारा येथील मजेठिया परिसरात नाट्यगृह उभारण्याचे काम हाती घेतले. मात्र, महापालिका प्रशासनाच्या संथ कारभारामुळे मागील पाच वर्षांपासून हे काम रखडले असून, सुरुवातीला साडेतीन कोटींच्या घरात असणारा या नाट्यगृहाचा खर्च आता तब्बल ६ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.

पालिका प्रशासनाने मूळ अंदाजपत्रक तयार करताना अत्यंत ढिसाळ नियोजन केले होते. नाट्यगृहासाठी अत्यंत आवश्यक असणारी ध्वनिक्षेपण यंत्रणा, वातानुकूलित यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणा यांसारख्या मूलभूत व महत्त्वाच्या बाबींचा मूळ प्रस्तावात समावेशच करण्यात आला नव्हता. यामुळे मुख्य वास्तू उभी राहूनही अंतर्गत सुविधांअभावी नाट्यगृहाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यासाठी १० जून २०२६ ही अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र, नाट्यगृहाच्या अंतर्गत वीजजोडणीचे काम बाकी असल्यामुळे अजून काही काळ नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वीजजोडणीसाठी अतिरिक्त खर्च मंजूर

नाट्यगृहातील वीजजोडणीच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या कामासाठी अतिरिक्त अडीच कोटी रुपये देखील महापालिकेकडून मंजूर करून घेण्यात आले आहेत. महापालिकेकडून या कामाची पाहणी करण्यात येत असून ते लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यात येईल, अशी माहिती शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी दिली आहे.