वसई : वसई विरार शहरात नाताळ सणाच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. या निमित्ताने वसई विरारमध्ये विविध ठिकाणी शोभयात्रा काढल्या जात आहेत. सोमवारी नालासोपारा पश्चिमेतील गास तर मंगळवारी वसई पश्चिमेतील माणिकपूर परिसरात ख्रिसमस कार्निवल काढण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषा परिधान करत यात मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते.

वसई विरार शोभायात्रा

वसई विरार शहरात दरवर्षी मोठ्या जल्लोषात नाताळ सण साजरा केला जातो. सजलेले बाजार, विद्युत रोषणाई, चर्चला केली जाणारी सजावट, नाताळचे पारंपरिक पदार्थ तयार करण्यासाठी सुरू असलेली लगबग यामुळे संपूर्ण शहरात नाताळचा उत्साह दिसून येत आहे. पण, या सणाला खरी रंगत येते ती दरवर्षी वसई विरारमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या ख्रिसमस कार्निवलमुळे. नाताळ सण हा केवळ धार्मिक सण म्हणून साजरा न होता. पर्यावरण प्रबोधन, संस्कृती संवर्धन, सामाजिक उपक्रम अशा विविध अंगाने साजरा केला जातो. त्यामुळे या कार्निवलला विशेष महत्त्व असते.

याच पार्श्वभूमीवर लहान सरगोडी सामाजिक संस्थेतर्फे नालासोपारा पश्चिमेतील गास परिसरात तर मंगळवारी रसिक रंजन नाट्य मंडळाच्या वतीने वसई पश्चिमेतील माणिकपूर परिसरात ख्रिसमस कार्निवल काढण्यात आले होते. शोभायात्रेत मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते.

नाताळ सणाचा देखावा, वसईतील पारंपारिक बँन्ड, ख्रिसमस कँरल, तीन राजे, बाळ येशुचा पाठलाग करणारा राजा, हेरोद, उंट, टांगे, पारंपारीक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या वेशभूषा करून अनेक जण यात सहभागी झाले होते. लोकनृत्याच्या गाण्यावर ठेका धरत एकमेकाला नाताळच्या शुभेच्छा देत मोठ्या जल्लोषात ख्रिसमस कार्निवल पार पडले. तर सामाजिक आणि जागतिक विषयांवर आधारित प्रश्नांवर समाजप्रबोधन करणारे मानवी देखावेसुद्धा या कार्निवलमध्ये तयार करण्यात आले होते.

ख्रिसमस कार्निवलमधून समाजप्रबोधन

वसई विरारमध्ये काढण्यात येणाऱ्या ख्रिसमस कार्निवलमधून प्रेम, क्षमा, शांती हा येशूचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला तर जातोच. पण, यंदा कार्निवलमध्ये तयार करण्यात आलेल्या मानवी देखाव्यातून तरुणांमध्ये वाढता ताण आणि आत्महत्या, जागतिक शांती, महिला सबलीकरण, विविधतेत एकता, सर्वधर्म समभाव असे विविध प्रकारचे संदेश लोकांपर्यत पोहोचवता आले असल्याची प्रतिक्रिया ऍलन डिमेलो यांनी दिली.