वसई : कोळीबांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अस्मितेचा असलेला नारळीपौर्णिमेचा सण गुरुवारी वसई-विरारमधील समुद्रकिनाऱ्यांवर प्रचंड उत्साहात पार पडला. विविध कोळीवाड्यांपासून ते थेट समुद्रकिनाऱ्यापर्यंत निघालेल्या भव्य मिरवणुकांनी परिसर दुमदुमून गेला होता. दर्याराजाची मनोभावे पूजा-अर्चा करत कोळीबांधवांनी भक्तीभावाने समुद्राला नारळ अर्पण केला. विशेषतः नायगाव कोळीवाड्यात यावर्षी राबवण्यात आलेल्या ‘एक गाव, एक नारळ’ या अनोख्या संकल्पनेने आणि मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

​पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने मासेमारी पूर्णपणे बंद असते. त्यामुळे नारळीपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर समुद्राला नारळ अर्पण करून, शांत होण्याची प्रार्थना केली जाते आणि नवीन मासेमारी हंगामाचा श्रीगणेशा होतो. गुरुवारी वसईतील अर्नाळा, नायगाव, पाचूबंदर, रानगाव यांसह विविध समुद्रकिनाऱ्यांवर आगरी-कोळी बांधवांची अथांग गर्दी जमली होती.

​पारंपरिक पेहरावात सजलेले लहान-थोर, बेंजो आणि ढोल-ताशांच्या कडकडाटात “सण आयलाय गो नारळी पुनवचा…” या लोकप्रिय पारंपरिक गाण्यांवर आनंदाने थिरकत होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच नृत्याचा आनंद लुटला. किनाऱ्यावर मानाच्या नारळाची विधिवत पूजा करण्यात आली. “यंदाचा मासेमारीचा हंगाम सुफळ संपूर्ण जाऊ दे, सागरातील सर्व संकटे दूर होऊन कोळीबांधवांच्या जीवनात समृद्धी येऊ दे,” अशी आर्त साद दर्याराजाला घालण्यात आली. हा नयनरम्य उत्सव डोळ्यांत साठवण्यासाठी पर्यटकांनी आणि स्थानिक नागरिकांनी किनाऱ्यांवर मोठी गर्दी केली होती

‘नारळफोडी’च्या रंगतीत ‘गरुडी’ नारळाचा थरार!

नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने वसईतील विविध भागांत पारंपरिक ‘नारळफोडी’ स्पर्धांची मोठी रंगत पाहायला मिळाली. सणाचा एक अविभाज्य भाग असलेल्या या स्पर्धेत जिंकण्यासाठी स्पर्धकांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली होती. यात बाजी मारण्यासाठी विशेष टणक कवच असलेले प्रजातीचे ‘गरुडी नारळ’ वापरले जातात, अशी माहिती स्थानिक कोळीबांधवांनी दिली.

​नायगाव कोळीवाड्यात ‘एक गाव… एक नारळ’ संकल्पनेचा नवा पायंडा

​नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून नायगाव कोळीवाड्यात गुरुवारी सायंकाळी ‘एक गाव… एक नारळ’ हा सामाजिक ऐक्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. एकता, भक्ती आणि पारंपरिक कोळी संस्कृतीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमासाठी संपूर्ण गाव एकवटले होते. श्री वाल्मिकीश्वर मंदिरापासून ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत ब्रास बँडच्या गजरात एकाच मानाच्या नारळाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. किनाऱ्यावर दर्याराजाची मनोभावे पूजा करून गावाच्या वतीने तो एकच नारळ समुद्राला अर्पण करण्यात आला. “मुंबईतील कोळीवाड्यांमधील सामूहिक परंपरेतून प्रेरणा घेऊन राबवलेल्या या उपक्रमामुळे नायगावची सामाजिक बांधिलकी आणि एकजूट अधिक दृढ झाली,” अशी भावना राम कोळी आणि तेथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.