वसई: वसई तालुक्यातील नागरिकांचे भूमिअभिलेख आणि भूमापन यांच्याशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी तहसील कार्यालयात गुरुवारी जनसंवाद दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली विविध भागातून आलेल्या नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करण्यात आला. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी दोन नवी भूमापन कार्यालये आणि सलोखा योजनेच्या जनजागृतीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

वसई विरार शहरातील इमारतींचे वाढते बांधकाम आणि नवनवीन खाजगी प्रकल्प अशा विविध कारणांमुळे जमिनीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तर त्यामुळे जागा निश्चित करणे, जागेचा आराखडा तयार करणे, सातबारा उताऱ्यातील बदल, जमिनीचे पोट हिस्से करणे, अशा विविध प्रकारच्या कामांसाठी भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज जातात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या विभागाचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना सतत या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत.

त्यामुळे जमिनीशी संबंधित नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार स्नेहा दुबे पंडित आणि भूमी अभिलेख कार्यालयाच्या समन्वयाने जनसंवाद दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते मिलिंद खानोलकर डॉमिनिका डाबरे, आणि सामान्य नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.

या उपक्रमा बाबत बोलताना आमदार स्नेहा दुबे पंडित म्हणाल्या की, जमिनीशी संबंधित विविध प्रकारच्या एकूण ६४ पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या विशेष उपक्रमांतर्गत नागरिकांच्या समस्या वैयक्तिकरीत्या ऐकून घेऊन त्या सोडवण्याच्या, मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांना काही लोकाभिमुख बदल करण्याचे, परिपत्रक काढण्याच्या सूचना दिल्या असल्याचे देण्यात आल्या आहेत. तसेच येत्या दोन ते तीन महिन्यात नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे देखील आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी म्हटले.

वसई तालुक्यात दोन नवी भूमापन कार्यालये

वसई तालुक्यातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे प्रशासकीय यंत्रणांवर देखील ताण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी १ जुलैपासून विरार आणि वसई येथे दोन नवी भूमापन कार्यालये सुरू केली जाणार आहेत. यामुळे नागरिकांच्या कामांचा निपटारा जलद गतीने होईल, असे भूमी अभिलेख उपाधिक्षक अमोल बदाडे यांनी सांगितले.

सलोखा योजनेच्या जनजागृतीसाठी विशेष शिबिर

जमिनीचे पोट हिस्से करण्यासाठी राज्य शासनाकडून सलोखा योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत फक्त दोनशे रुपये देऊन पोट हिस्से करता येतात. जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी भूमी अभिलेख कार्यालाला महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी विशेष शिबिर भरवण्याच्या सूचना दिल्या असल्याचे आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी सांगितले. तसेच १ मे पासून या शिबिराला सुरुवात होणार असून योजनेची माहिती आणि अंमलबजावणी यावेळी करण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा यावेळी करण्यात आले.