वसई:- पावसाळ्यापूर्वी वसई विरार शहरात महापालिकेने नालेसफाईचे काम हाती घेतले आहे. मात्र बहुतांश ठिकाणच्या भागात अर्धवट स्थितीत सफाई केली आहे. तर अजूनही अनेक ठिकाणचे नाले व गटारातील गाळ उपसा करण्यात आला नाही. त्यामुळे महापालिकेकडून नालेसफाईचे करण्यात येत असलेले दावे फसवे असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे.

पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये याच अनुषंगाने शहरात १९१ किलोमीटर पर्यंतच्या सुमारे २०६ नाल्यांच्या स्वच्छतेचे काम महापालिकेने सुरू केले आहे. यासाठी १८ कोटी रुपये इतका निधी खर्च केला जात आहे. सद्यस्थितीत महापालिकेने ७० टक्के नाल्यांची सफाई करण्यात आली असल्याचा दावा ही केला आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नालेसफाई योग्यरित्या होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांमधून केल्या जात आहेत.

संबंधित ठेकेदार नाल्याच्या तळापासून सरसकट गाळ न काढता केवळ ‘वर वर’ नालेसफाई करत असल्याचे समोर आले आहे. नाल्यांच्या मध्यभागी आणि किनाऱ्यालगत अजूनही मोठ्या प्रमाणात गाळ तसाच पडून आहे. तर काही नाल्यांची स्वच्छता करण्यात आली नाही. प्रभाग समिती ‘एच’ कार्यक्षेत्रातील दिवाणमान, सनसिटी येथील तुळजाभवानी मंदिरसमोरील उद्यानालगत असलेल्या नाल्याची सफाई अत्यंत अर्धवट स्थितीत आहे, असे नगरसेवक महेश सरवणकर यांनी सांगितले आहे.

अन्य ठिकाणच्या भागात ही अशीच स्थिती आहे. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करावी व योग्यरित्या नालेसफाई करण्यात यावी. तसेच जे ठेकेदार थातुरमातुर पद्धतीने काम करीत आहेत त्यांची देयके देऊन नयेत अशी मागणी सरवणकर यांनी महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे केली आहे.

तर नालासोपारा पश्चिमेतील (प्रभाग क्रमांक १४) नाल्यांची अवस्था बिकट असल्याचे चित्र दिसून येत आहे. पावसाळा तोंडावर आहे, असे असताना नाले अजूनही गाळाने व कचऱ्याने भरलेले आहेत असे भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे वसई जिल्हाध्यक्ष ॲड सतीश भोंडवे यांनी सांगितले आहे.तर वसईतील वालीव आणि सातिवली या औद्योगिक वसाहतीतून गेलेले नाले नीट स्वच्छ न झाल्याने या भागातली वस्ती जलमय होते.

तर यंदाही पालिकेकडून नालेसफाईचे काम सुरू असले तरी ते संथ गतीने सुरू असल्याचे, सामाजिक कार्यकर्ते देविदास केंगार यांनी सांगितले आहे. तसेच नाल्याचे पाणी वस्तीत शिरू नये यासाठी संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.नालासोपारा पूर्व येथील धानिव बाग, विरार पश्चिमेतील विराट नगर नाला, जूचंद्र खाडी यासह अनेक भागात नाल्यांची सफाईच झाली नाही. मे महिना संपत आला आहे जर वेळेत ही कामे मार्गी लागली नाहीत तर पुन्हा नागरिकांना पूरस्थितीला सामोरे जावे लागेल.

आयुक्तांकडून तातडीने पाहणी

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मंगळवारी महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी पाहणी दौरा केला. या दरम्यान आचोळे, दिवाणमान, बाभोळा आणि वसई किल्ला परिसरातील नाल्यांची व चेंबर सफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी गाळ तात्काळ उचलण्याचे, नाल्यांमधील अडथळे दूर करण्याचे आणि सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे कडक निर्देश संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिले. तसेच कामात कोणतीही हलगर्जी न करता नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आदेश दिले.पावसाळापूर्व कामांसाठी प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांनीही नाल्यांमध्ये कचरा किंवा प्लास्टिक न टाकता शहर पूरमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

लोकप्रतिनिधींकडून आढावा

नाल्यांची सफाईची कामे योग्यरित्या झाली आहेत किंवा नाहीत याचा महापौर अजीव पाटील व खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजन नाईक यांच्या मार्फत नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यात आला आहे. बुधवारी सवरा यांनी ९० फिट प्रगती नगर, रेल्वे नाला (विरार पूर्व) येथे आज प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांना पावसाळ्यापूर्वी कामे मार्गी लावावीत, अशा सूचना दिल्या आहेत.

महावितरणच्या उच्चदाब वाहिनीचे अडथळे

वसई विरार शहरात काही ठिकाणी नाले गेले आहेत त्याठिकाणी महावितरणच्या उच्चदाब वाहिन्या गेल्या आहेत. विशेषतः विरारच्या विराट नगर परिसरात असलेले दोन नाले आहेत. अशा ठिकाणी नालेसफाई करताना अडचणी येत असल्याचे सहायक आयुक्त जितेंद्र नाईक यांनी सांगितले आहे. याबाबत आम्ही कळविले आहे. त्या बाजूला झाल्यानंतर तेथील नालेसफाई केली जाईल. याशिवाय अन्य भागातही जिथे नालेसफाईचे काम बाकी आहे ते पूर्ण केले जाणार आहे असे नाईक यांनी सांगितले आहे.