वसई: वसई विरार शहरातील रस्त्यांवरील पार्किंगला शिस्त लावण्यासाठी महापालिकेकडून सम-विषम पार्किंगच्या पाट्या बसविण्यात आल्या होत्या. हे धोरण अंमलात येऊन दोन वर्षे उलटली आहेत. मात्र, त्यानंतरही नागरिकांकडून या नियमाचे पालन केले जात नसल्याने सम-विषम पार्किंग धोरणाचा पुरता बोजवारा उडाला आहे.

वसई विरार शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी आणि रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा वसई आणि वसई-विरार शहर महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि वर्दळीच्या चौकांत सम-विषम पार्किंग लागू करण्यात आले होते. याचप्रमाणे महापालिकेच्या हद्दीत दुचाकी, चारचाकी, नो-पार्किंग आणि सम-विषम तारखांनुसार वाहने उभी करण्यासाठी सुमारे ४८१ हून अधिक विविध प्रकारचे फलक बसविण्यात आले होते. नियमानुसार रस्त्याच्या एका बाजूला सम तारखेला (२, ४, ६…) आणि दुसऱ्या बाजूला विषम तारखेला (१, ३, ५…) वाहने उभी करणे बंधनकारक करण्यात आले होते.

मात्र, नागरिकांच्या उदासीनता व वर्षागणिक वाहनांची वाढती संख्या यामुळे सध्या वसई पूर्व स्टेशन रोड, १०० फुटी रस्ता, माणिकपूर, अंबाडी रोड, नालासोपारा श्रीप्रस्थ, आचोळे रोड, सेंट्रल पार्क, तसेच विरार शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनचालक तारखांचा विचार न करता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी करत आहेत. त्यातच या पार्किंगच्या जागांवर आता गॅरेज चालक, व्यावसायिक, दुकाने आणि फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. दुरुस्तीसाठी आलेली वाहने, अवजारे आणि सामान पार्किंगच्या जागेतच मांडले जात असल्याने सर्वसामान्यांना वाहने उभी करायला जागा उरलेली नाही. त्यामुळे दोन वर्षातच वसईतील सम – विषम पार्किंगच्या धोरणाचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

याबाबत वाहतूक विभागाशी संपर्क साधला असता, सम – विषम पार्किंगचे नियम न पाळणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. अवैध पद्धतीने वाहन उभे करणाऱ्यांविरोधात डिजिटल चलान फाडले जाते. त्यांनी ते न भरल्यास त्यांना नोटीस पाठवली जाते. तसेच दंडाची रक्कम थकवणाऱ्यांना परिवहन प्रादेशिक विभागात काम असल्यास ते पूर्ण करण्यातही अडथळे येतात. त्यामुळे नागरिकांनी नियम पाळावेत यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

जागेअभावी अनेक ठिकाणी पाट्याच नाहीत

वाहतूक विभागाने शहरात ४८१ ठिकाणी पालिकेच्या बांधकाम विभागास दुचाकी, चारचाकी, नो-पार्किंग आणि सम-विषम पाट्या लावण्यास सांगितले होते. मात्र, काही ठिकाणी रस्ते अरुंद असल्याने, तर काही परिसर अतिशय वर्दळीचे असल्याने त्या ठिकाणी पाट्या लावल्याच नसल्याचे पालिकेच्या बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.

एकूण पाट्यांची संख्या:
दुचाकी पार्कीग पाट्या -१२६
चारचाकी पार्कीग पाट्या -८२
नो पार्कींग पाट्या -२५३
सम-विषय तारीख पाट्या -२०
एकुण पाट्या – ४८१