वसई: वसई विरार शहरात काही भागात भातशेती केली जाते. मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे दाणे भरण्याच्या अंतिम टप्प्यात आलेले भातपीक नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात पिकांना जास्त पाणी लागत असल्यामुळे तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

सध्या महाराष्ट्रभरात दुष्काळाची सावट पसरले आहे. महाराष्ट्राचा ७५ टक्के भाग म्हणजे ३५८ पैकी एकूण २६५ जिल्ह्यांच्या समावेश दुष्काळी जिल्ह्यात करण्यात आला आहे. तर ठाणे व पालघर या जिल्ह्यांना यातून वगळण्यात आले आहे. मात्र, वसई तालुका व पालघर जिल्ह्यात असमान प्रमाणात पडलेला पाऊस व वाढती उष्णता यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

वसई तालुक्यात यंदाच्या वर्षात ७ हजार ते ७ हजार २०० हेक्टर दरम्यानच्या क्षेत्रावर भातपिकाची लागवड करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने हळवे, निमगरवे व गरवे वाणांचा समावेश आहे. हळवे हे वाण सध्या हे पीक दाणे भरण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. पुढील १० ते १५ दिवसांत म्हणजे १० ते १५ ऑक्टोबरदरम्यान कापणी सुरू होईल. तर निमगरवे व गरवे वाण सध्या फुलोरा आणि दाणे भरण्याच्या संवेदनशील अवस्थेत आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या भातपिकांना इतर महिन्यांच्या तुलनेत जास्त पाण्याची गरज आहे.

तर किमान पुढच्या आठवड्यात तरी पाऊस पडल्यास काहीसा दिलासा मिळू शकेल, असे मत पारोळचे शेतकरी नरेश पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच यंदा पाऊस उशिरा आल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी पेरणी झाली आहे. तर असमान पाऊस झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे आठवडाभरात पाऊस न पडल्यास पालघर जिल्ह्याचाही दुष्काळग्रस्त जिल्ह्यात समावेश करण्याबाबत शासनाकडून विचार व्हावा, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.

तर ऑगस्टमध्ये सरासरीच्या अवघा ४३ टक्के आणि सप्टेंबरमध्ये १७ टक्के पाऊस झाला आहे. सध्या जमिनीत ओलावा आणि सखल भागात पाणी उपलब्ध असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु, पुढील ६ ते ७ दिवसांत पाऊस न पडल्यास आणि कडक ऊन राहिल्यास आवश्यकतेनुसार पीक पाहणी प्रयोग आणि पंचनामे करून शासनाला पुढील अहवाल सादर केला जाईल, असे तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी सांगितले आहे.

पालघर दुष्काळी जिल्ह्याच्या यादीतून बाहेर का?

जुलै महिन्यात तालुक्यात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाला होता. तर जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत एकूण ८७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. सरकारी नियमानुसार जुलै अखेर ५० टक्क्यांपेक्षा कमी किंवा सप्टेंबर अखेर ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असल्यास आपोआप दुष्काळ किंवा पर्जन्यछायेचा ट्रिगर लागू होतो. पण, वसईत ८७ टक्के पावसाची नोंद झाल्याने ही अट लागू होत नाही.