वसई: राज्य परिवहन मंडळाच्या बसस्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी आणि अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार वसई विरार शहरातील बस आगारात २०० मीटर परिसर ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
वसई विरार शहरात राज्य परिवहन महामंडळाचे आगार आहेत. यात नवघर, नालासोपारा, वसई, अर्नाळा आणि विरार या आगारांचा समावेश होतो.या आगारातून लांब पल्याच्या व इतर जवळपासच्या भागात एसटीची सेवा दिली जाते. मात्र या आगारात बेकायदेशीर पणे खाजगी वाहने उभी करण्याचे प्रकार वाढू लागले आहे. रिक्षा, चारचाकी, दुचाकी अशी वाहने एसटी बस ये जा करण्याच्या व वळण घेण्याच्या मार्गातच उभ्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. याशिवाय अन्य प्रवासी वर्गाला याचा त्रास सहन करावा लागतो.
आगाराच्या जागेत होणारी बेकायदेशीर पार्किंग आळा घालण्यासाठी बसस्थानक परिसरातील २०० मीटरच्या आत अवैधपणे वाहने पार्क करणाऱ्या आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक नाईक यांनी दिले आहेत. त्याच अनुषंगाने वसई व पालघर मधील एसटी महामंडळाने अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.
पालघर विभागात सुरक्षा व दक्षता अधिकारी श्कल्पेश सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने धडक मोहीम हाती घेतली आहे. ५ ते १५ जून या कालावधीत ही मोहीम राबविली जाणार आहे.
१७ वाहनांवर कारवाई
नुकताच नालासोपारा आणि विरार येथील आगारात कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला वाहनचालकांना समज देऊन बाहेर काढण्याची सूचना दिली होती. मात्र त्यानंतर ही वाहने बाजूला न काढण्यात आल्याने
त्यावर कारवाई केली आहे. आतापर्यंत दोन्ही आगारात मिळून १७ वाहनांवर कारवाई केली आहे.सुरक्षा व दक्षता अधिकारी कल्पेश सोलंकी, सहायक सुरक्षा निरीक्षक श्रविंद्र जाधव, मंगा चव्हाण व वाहतूक पोलीस यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. वसई विरार नव्हे तर पालघर मधील आगारात ही कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
