वसई: वसई विरार महापालिकेने पर्युषण पर्वानिमित्त दोन दिवस शहरातील मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पालिकेने हा तुघलकी निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला, असा प्रश्न उपस्थित करत मराठी एकीकरण समितीने पालिकेच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला आहे. जैन धर्मीयांमध्ये पर्युषण पर्व या सणाला मोठे महत्त्व आहे. मन, वाणी आणि आचरण यांचे परीक्षण करून आपल्या चुका ओळखणे, वासनांवर आणि विकारांवर नियंत्रण मिळवणे, तपश्चर्या करणे, स्वाध्याय करणे आणि शेवटी सर्व जीवांची क्षमा मागणे, हा पर्युषण पर्वाचा मूलभूत संदेश आहे.

मुंबईसह मिरा-भाईंदर व वसई-विरार महापालिका क्षेत्रातही मोठ्या संख्येने जैन धर्मीय बांधव वास्तव्यास आहेत. त्यामुळे २०१९ साली या परिसरातील कत्तलखाने पर्युषण पर्व काळात बंद ठेवण्याची मागणी जैन धर्मियांनी केली होती. या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने २९ जून २०१९ साली शासन निर्णय जारी केला. शासनाने लागू केलेल्या नियमानुसार संपूर्ण पर्युषण काळात कत्तलखाने सलग बंद न ठेवता, पर्युषण पर्वाचा पहिला आणि शेवटचा दिवस असे एकूण दोन दिवस कत्तलखाने बंद ठेवण्यात येतात.

यंदा ८ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर रोजी पर्युषण पर्व पाळले जाणार आहे. या दरम्यान वसई विराग महापालिका क्षेत्रातील मांस विक्री ८ सप्टेंबर व १५ सप्टेंबर या दोन्ही दिवशी बंद ठेवण्यात यावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. याबाबतच सूचना मंगळवारी जारी करण्यात आली.

मात्र, वसई विरार शहरातील भूमिपुत्रांचा आहार हा मांसाहार आहे. त्यामुळे पालिकेने कत्तलखाने बंद ठेवण्याबाबत परिपत्रक काढून त्यांत मांस, मटण, चिकन या गोष्टींचा संदर्भ देऊन हा तुघलकी निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला? असा प्रश्न मराठी एकीकरण समितीने उपस्थित केला आहे.