वसई: धुळवडीच्या दिवशी मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांना आवर करण्यासाठी वाहतूक विभागाने वसई विरार मध्ये विशेष मोहीम राबविली होती. यात शंभरहून अधिक तळीरामांवर कारवाई केली आहे.धुळवडीचा आनंद साजरा करीत असताना अनेक जण मद्यपान करतात व मद्याच्या नशेतच वाहने चालविली जातात. यामुळे अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना समोर येतात.
अशा घटना घडू नये यासाठी वसई विरार शहरातील वाहतूक विभाग सतर्क होऊन मंगळवारी धुळवडीच्या दिवशी विशेष बंदोबस्त लावण्यात आला होता. नालासोपारा येथील उड्डाणपुलाच्या खालील बाजूस, सिव्हीक सेंटर नालासोपारा, संतोष भुवन नालासोपारा, तर वसईतील बाभोला नाका , रेंज नाका, विरार मधील आर जे नाका, विरार जकात नाका, साईनाथ नगर, आर जे सिग्नल नाका, समुद्र किनाऱ्यावर जाणारे मार्ग यासह विविध भागात हा बंदोबस्त होता.
या नेमण्यात आलेल्या पथकांकडून मद्यपी वाहनचालकांवर करडी नजर ठेवण्यात आली होती. ब्रीथ अॅनालायझर यंत्राद्वारे वाहनचालकांची तपासणी सुरू होती. वसई वाहतूक विभागाच्या अखत्यारीत ५२ वाहन चालक मद्यपान करताना आढळून आले.तर विरार वाहतूक विभागाच्या अखत्यारीत ५७ मद्यपी अशा एकूण १०९ जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात ही विशेष मोहीम राबविण्यात आली असून संबंधितांवर मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
