वसई : शहरातील वारंवार अपघात घडणाऱ्या धोकादायक ठिकाणांची यादी पोलिसांनी तयार केली असून या ब्लॅक स्पॉटची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी या सर्व ठिकाणी माहिती फलक लावण्यात येणार आहे. अशा प्रकारे ब्लॅक स्पॉटची माहिती प्रथमच दिली जाणार आहे.

ज्या ठिकाणी तीन वर्षांत पाच अपघात आणि दहा जणांचा मृत्यू झाला असेल त्या ठिकाणच्या पाचशे मीटर परिसराला ब्लॅक स्पॉट असे म्हटले जाते. वाहतूक पोलिसांकडून असे ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित केले जातात. मात्र नागरिकांना त्याची माहिती नसते. त्यामुळे ब्लॅक स्पॉट परिसरात अपघात होत असतात. यासाठी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने शहरातील १६ ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्या ठिकाणी फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. सलग रस्ता असल्याने वाहनांचा वेग जास्त असणारी ठिकाणे, चुकीच्या दिशेने वाहने नेण्याची ठिकाणे, रस्त्यावरील तीव्र वळण आणि लेन कटिंग होण्याची ठिकाणे ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखली जातात.

या ब्लॅक स्पॉटच्या परिसरात प्रवेश करतानाच वाहनचालकांना धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात येणार आहे. ‘सावधान! तुम्ही ब्लॅक स्पॉट परिसरात आहात’ अशा आशयाचे हे फलक असणार आहेत. ब्लॅक स्पॉट परिसरातून बाहेर पडतानादेखील तशी सूचना देणारे फलक लावण्यात येणार आहेत.

अशा प्रकारे वाहनचालकांना ब्लॅक स्पॉटची माहिती देण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे अपघातांना आळा बसेल, असा विश्वास पोलीस आयुक्त (मुख्यालय) विजयकांत सागर यांनी व्यक्त केला.

ब्लॅक स्पॉट

ब्लॅक स्पॉट                             अपघात

पाली दिल्ली दरबार हॉटेल                    २९

मीरा गावठाण —                          १३

काजूपाडा —                                     २३

हाडकेश —                                       ७

प्लेसेंट पार्क —                             ४

किनारा ढाबा —                                  २९

दुर्गामाता मंदिर—                                १०

हॉटेल रॉयल गार्डन ससूनवघर —           २०

एच पी पेट्रोलपंप —                            २५

वास माऱ्या पूल —                             १०

बापाने पूल —                                २३

हॉटेल साधना चिंचोटी —                       ४७

* बर्माशेल पेट्रोलपंप —                         २०

* हॉटेल गोल्डन चॅरीअट —                     ९

* सायली पेट्रोलपंप—                       २८

* वंगणपाडा —                            २