वसई: मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या झोन-१ अंतर्गत मराठी भाषा दिनानिमित्त पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली २ कोटी रुपयांची मालमत्ता तक्रारदारांना परत केली आहे. यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.

२७ फेब्रुवारी रोजी राज्यभर मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी हा विशेष दिन साजरा केला जात असल्यामुळे विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पण, यादिवशी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम मात्र अतिशय कौतुकास्पद ठरला आहे.

२७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा दिनाचे’ औचित्य साधून मिरारोड पूर्व येथील शहनाई हॉलमध्ये विशेष मालमत्ता वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे होते. या कार्यक्रमात आयुक्तालयाच्या झोन-१ अंतर्गत पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली तब्बल २ कोटी १८ लाख १५ हजार ५२० किंमतीची मालमत्ता मूळ तक्रारदारांना सन्मानाने परत करण्यात आली.

या कार्यक्रमात भाईंदर आणि काशिमीरा पोलीस ठाण्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करत परत मिळवलेली ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील १ कोटी ५३ लाख ८३ हजार ६१८ रुपयांची रक्कम मूळ खातेधारकाच्या खात्यात वर्ग करण्यात आली. तसेच ६२६ ग्रॅम सोने आणि ९३५ ग्रॅम चांदी असा एकूण
२९ लाख ५५ हजार २८५ रुपयांचा ऐवज नागरिकांना परत करण्यात आला.

तसेच विविध कंपन्यांचे २५ लाख ४१ हजार ४०२ रुपये किंमतीचे १४९ मोबाईल फोन मालकांना परत देण्यात आले. तर मोटारसायकल आणि रिक्षा अशी ९ लाख ३५ हजार २१५ रुपयांची १२ वाहने मूळ मालकांना परत करण्यात आली. पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात तक्रारदारांना त्यांची मालमत्ता सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी, मराठी भाषा दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्याला पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, झोन-१ चे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांच्यासह विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त आणि झोन-१ मधील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.