वसई: मागील १५ वर्षांपासून पालिकेने वसई विरार शहरात एकही शवविच्छेदन केंद्र तयार केले नसल्याने जिल्हा परिषदेच्या केंद्रावर अवलंबून राहावे लागत आहे. महापालिकेला स्वतःचे केंद्र सुरू करता यावे यासाठी शवविच्छेदन करण्यासाठी लागणाऱ्या तज्ञ डॉक्टरांना प्रशिक्षण देऊन त्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. मात्र, याबाबत अनेकदा पत्रव्यवहार करूनही मुंबईतील रुग्णालयाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे वसई विरारमधील डॉक्टर अजूनही प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत.

वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढू लागले आहे. त्यातच शहरात अपघाती मृत्यू, आत्महत्या, अकस्मात मृत्यू अशा विविध घटना समोर येत असतात. या प्रकरणातील कारवाईला गती देण्यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन होणे गरजेचे असते. पण, वसई विरार महापालिका स्थापन झाल्यापासून आजतागायत पालिकेने स्वतःचे एकही शवविच्छेदन केंद्र तयार केलेले नाही.

त्यामुळे आजही जिल्हा परिषदेच्या शवविच्छेदन केंद्रांमार्फतच मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेचे विरार ग्रामीण रुग्णालय तसेच कामण, नवघर, सोपारा, आगाशी, आणि भाताणे या आरोग्य केंद्राच्या ठिकाणी शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही व्यवस्थाही अपुरी असल्यामुळे नागरिकांना मृतदेह घेऊन ताटकळत राहावे लागते. तर काही वेळा नागरिकांना व पोलिसांना मुंबई यासह इतर ठिकाणी शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह घेऊन जावे लागते. त्यामुळे पोलीस अधिकारी तसेच नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

तसेच, शहरात सुरू असणाऱ्या शवविच्छेदन केंद्रांमध्ये मनुष्यबळही अपुरे आहे. विशेषतः मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी शवविच्छेदन कर्मचारी (कटर) हवा असतो. पण, केंद्रात शवविच्छेदन कर्मचारी (कटर) नसल्याने खाजगी शवविच्छेदन कर्मचाऱ्याचा (कटर) आधार घ्यावा लागतो. यासाठी अतिरिक्त पैसे ही नागरिकांना मोजावे लागत आहे.

महापालिकेने वाढते नागरीकरण व येथील समस्या लक्षात घेऊन शवविच्छेदन केंद्र तयार करावे, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती. त्यानुसार महापालिकेने शवविच्छेदन प्रक्रियेसाठी तज्ञ डॉक्टरांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत शवविच्छेदन करवून घेतले जाणार आहे. या प्रशिक्षण मिळावे यासाठी मुंबई येथील जे जे रुग्णालयात महापालिकेने पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अजूनही प्रशिक्षणासाठी मुंबईतील रुग्णालयांनी प्रतिसाद न दिल्यामुळे डॉक्टरांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.

शवविच्छेदन केंद्र सुरू व्हावे यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशिक्षणासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयाशी संपर्क केला आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर आमचे डॉक्टर प्रशिक्षणासाठी पाठविले जातील. – डॉ भक्ती चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका