वसई: पावसाच्या आगमनानंतर वसई-विरार शहरातील बहुतांश रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून संपूर्ण शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्ते दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या नावाखाली महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला असला, तरी प्रत्यक्षात मात्र रस्ते खड्डेमयच राहिल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

​मागील एक ते दीड वर्षाच्या कालावधीत महापालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी तब्बल ६८ कोटी रुपये, त्यानंतर शहरातील प्रमुख आठ रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी ५५ कोटी ७९ लाख रुपये आणि पुन्हा खड्डे बुजवण्यासाठी २५ कोटी रुपये अशा वेगवेगळ्या निविदा काढल्या आहेत. जवळपास १४८ कोटींहून अधिक रकमेचा निधी या कामांवर खर्च होऊनही रस्त्यांची स्थिती ‘जैसे थे’ आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून त्यांना तळ्याचे स्वरूप येत असल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी एक ते दीड फूट खोल खड्डे पडले असून त्यात दुचाकी घसरून चालक गंभीर जखमी होत आहेत.

​मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमालीचा मंदावला असून संपूर्ण शहरात ठिकठिकाणी तीव्र वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका कामावर वेळेत पोहोचण्यासाठी धडपडणाऱ्या चाकरमान्यांना, शाळेच्या बस अन् व्हॅनमध्ये तासनतास अडकून पडणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना तसेच दिवसभर रस्त्यावर गाड्या चालवणाऱ्या रिक्षाचालकांना बसत आहे. तासनतास कोंडीत अडकून पडल्यामुळे प्रवाशांचे हाल तर होत आहेतच, शिवाय सर्वसामान्य नागरिकांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात आहे.

​शहरातील नालासोपारा पूर्वेतील धानिवबाग, संतोष भुवन, वाकणपाडा, नालासोपारा पश्चिमेकडील श्रीप्रस्थ रोड, नायगाव-बापाणे रस्ता, विरार पूर्व कण्हेर चौकी, बरफपाडा, कोपरी, अग्रवाल, भोयदापाडा, वालीव, एव्हरशाईन ते अंबाडी रस्ता आणि नायगाव-टिवरी रस्त्यासह बहुतांश भागांत खड्ड्यांमुळे वाहतुकीचा पार बोजवारा उडाला आहे. रस्ते तयार करताना कामाचा दर्जा अजिबात राखला जात नाही; तसेच या निकृष्ट कामांकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. “आज नागरिकांना ना नीट चालण्यासाठी रस्ता उरला आहे ना वाहन चालवण्यासाठी,” अशी तीव्र आणि संतप्त प्रतिक्रिया मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी सागर पाटील यांनी दिली आहे. करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करूनही जर दररोज वाहतूक कोंडी आणि जीवघेण्या खड्ड्यांचाच सामना करायचा असेल, तर प्रशासनाने या दुरवस्थेची जबाबदारी कोणावर निश्चित केली आहे? असा संतप्त सवाल ही नागरिक विचारत आहेत.

काँक्रिटीकरणाची केवळ घोषणा

​पावसाळ्यात खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी शहरातील १८ किमीचा विरार फाटा ते अर्नाळा, ११ किमीचा नालासोपारा फाटा ते नालासोपारा पश्चिम, ११ किमीचा वसई फाटा ते वसई गाव, १० किमीचा बापाणे फाटा-जूचंद्र ते उमेळा फाटा, ५ किमीचा टिवरी फाटा ते भोयदापाडा, ४ किमीचा सातिवली फाटा ते रेंज ऑफिस आणि ३ किमीचा वर्धमान इंडस्ट्रियल ते गावराईपाडा नाका अशा एकूण सात प्रमुख रस्त्यांचे विस्तारीकरण व काँक्रिटीकरण ‘एमएमआरडीए’मार्फत केले जाणार आहे. याबाबत वारंवार लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या बैठका होतात. मात्र आश्वासनांच्या पलीकडे काहीच होत नसल्याने काँक्रिटीकरणाची केवळ घोषणा ठरू लागली आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

खड्डे पडण्याची प्रमुख कारणे

१) अनेक ठिकाणी रस्त्यालगत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य गटारेच नाहीत. साचलेल्या पाण्यामुळे डांबरी रस्ते वेगाने खराब होत आहेत.

​२) रस्ता पूर्ववत खोदून, व्यवस्थित ‘पिचिंग’ करून काम करण्याऐवजी जुन्याच रस्त्यांवर केवळ डांबराचा थर देऊन थातूरमातूर दुरुस्ती केली जाते.

३) रस्त्याचे नूतनीकरण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच जलवाहिनी किंवा केबल वाहिन्या टाकण्यासाठी वारंवार खोदकाम केले जाते, ज्यामुळे रस्ते उध्वस्त होत आहेत.

खड्डे दुरुस्तीचे काम सुरू

जुलैच्या अतिवृष्टीमुळे पाणी साचून रस्ते उखडल्याची कबुली पालिका प्रशासनाने दिली आहे. सध्या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे डांबर आणि मास्टिकच्या साहाय्याने युद्धपातळीवर बुजवले जात असून लवकरच नागरिकांना दिलासा मिळेल, असा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच यापूर्वी खड्डे दुरुस्ती केली होती अशा ठिकाणी खड्डे तयार झाले असतील त्या रस्त्यांची दुरुस्ती कंत्राटदारांच्याच माध्यमातून केली जाईल. तशा सूचना ही दिल्या आहेत असे प्रभारी शहरअभियंता प्रदीप पाचंगे यांनी सांगितले आहे.