वसई: ​पावसाळ्यापूर्वी महापालिका प्रशासनाने रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण न केल्यामुळे वसई-विरार शहरातील नागरिकांना दररोज अत्यंत धोकादायक प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाच्या या उदासीन कारभारावर संतप्त झालेल्या लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी रविवारी थेट रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून महापालिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला.

​पावसाळा सुरू होताच वसई-विरार शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असून जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी तर एक ते दीड फूट खोल खड्डे तयार झाले असून, काही भागांत रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. अशा खड्डेमय आणि निसरड्या रस्त्यांवरून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

​प्रभाग क्रमांक १८ मधील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. रस्त्यांसोबतच येथील ड्रेनेज (गटार) व्यवस्थाही पूर्णपणे कोलमडली आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्यामुळे अनेक सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने ते अधिक धोकादायक बनले असून, नागरिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून या गंभीर समस्येवर वर्षानुवर्षे कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही.

​रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, दर्जेदार डांबरीकरण, खड्डेमुक्ती आणि प्रभावी ड्रेनेज व्यवस्था उभारण्यासाठी आम्ही जानेवारी महिन्यापासून महापालिकेकडे सातत्याने लेखी निवेदने दिली, पत्रव्यवहार केला आणि पाठपुरावाही केला. मात्र, प्रशासनाने या सर्व मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. म्हणूनच महापालिकेच्या या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी आम्ही खड्ड्यात वृक्षारोपण करण्याचे पाऊल उचलले असल्याचे भाजपचे नगरसेवक गणेश पाटील यांनी सांगितले.

​परिवहन सेवेला फटका

​वसई पूर्वेतील गावराईपाडा हा वसई-विरारमधील एक अत्यंत महत्त्वाचा औद्योगिक परिसर मानला जातो. येथे दररोज हजारो कामगार, कर्मचारी, व्यावसायिक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक ये-जा करत असतात. मात्र, येथील रस्त्यांची दुरवस्था इतकी गंभीर झाली आहे की, सार्वजनिक परिवहन सेवेच्या (बसेस) फेऱ्यांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक मार्गांवर नियमित सेवा देणे कठीण झाले असून, काही ठिकाणी तर परिवहन सेवा तात्पुरती बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

याचा थेट फटका स्थानिक उद्योग, व्यवसाय आणि नोकरदार वर्गाला बसत आहे. यासाठी ​रस्त्यांवरील खड्डे तात्काळ उच्च दर्जाचे साहित्य वापरून बुजवावेत आणि आवश्यक तिथे तातडीने डांबरीकरण करून रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित करावेत.
​पावसाळा संपताच प्रभागातील सर्व प्रमुख आणि वर्दळीच्या रस्त्यांचे कायमस्वरूपी सिमेंट काँक्रिट रस्त्यांमध्ये रूपांतर करावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.