वसई: वसई विरार शहरातील रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांच्या विरोधात महापालिकेच्या कार्यालयाशेजारी सामाजिक कार्यकर्ते विनोद तिवारी यांनी मागील सहा दिवसापासून उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी आंदोलनकर्त्यांशी मोबाईल व्हिडिओद्वारे संपर्क साधून या आंदोलनाला समर्थन दर्शविले आहे.
पावसाळा सुरू होताच वसई-विरार शहरात ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यामुळे वसई विरार शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर समाज सेवक विनोद तिवारी यांनी १५ ऑगस्ट पासून सडक सत्याग्रह उपोषण सुरू केले आहे. महापालिका प्रशासन आणि कंत्राटदारांच्या संगनमतामुळे रस्ते बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा थेट आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने मान्सूनच्या पहिल्याच पावसात शहरातील मुख्य रस्त्यांसह सर्वच भागांतील रस्ते उखडले आहेत.
रस्ते बांधकामाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कडक कारवाई करावी, तसेच प्रभारी शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी राजीनामा द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मागील सहा दिवसांपासून हे उपोषण सुरू असून अजूनही त्यावर तोडगा निघाला नाही.
तिवारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला नागरिकांसोबतच सामाजिक संघटना यांचा पाठींबा मिळत आहेत. अशातच कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी नुकताच उपोषणाला बसलेल्या नागरिकांशी मोबाईल व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी आंदोलन कर्त्यांनी ही शहरातील समस्यांबाबत माहिती दिली. यावेळी दीपके यांनी आपण तुमच्या सोबत आहोत असे सांगत समर्थन दिले. तसेच विनोद तिवारी यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत काळजी घ्या असा सल्ला ही दीपके यांनी दिला.
