वसई: उष्णतेची तीव्रता अधिक वाढत असतानाच मागील काही दिवसांपासून वसई विरार मधील विविध ठिकाणच्या भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अधूनमधून वीज गायब असल्याने याचा मोठा फटका हा नागरिकांना बसू लागला आहे.

वसई विरार शहरात महावितरण तर्फे वीज पुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत असून वीज ग्राहकांची संख्या ही वाढली आहे. असे जरी असले तरी सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यातच वाढत्या तापमान यामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत.

दिवसातून अनेक वेळा वीज नसल्याने कामकाज करण्यासाठीही अडचणी निर्माण होत आहेत. तसेच वीज ये- जा करत असल्याने घरातील विद्युत उपकरणांत मध्ये बिघाड होऊन नुकसान सहन करावे लागत आहे.

गेल्या विरार, वसई गाव, नायगाव, माणिकपूर, उमेळमान, नायगाव पूर्व परीसर यासह इतर ठिकाणच्या भागात वीज पुरवठा खंडित होत असल्याचे ग्राहकांनी सांगितले आहे. मंगळवारी वाकीपाडा, चंद्रपाडा भागातही जवळपास आठ ते दहा तास वीज नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

उन्हाळा असल्याचे विजेचा वापर वाढला आहे. त्यामुळे वीज यंत्रणेवर ताण येऊन ब्रेकडाऊनचे प्रकार घडत असल्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. मात्र त्यानंतर तातडीने त्याची दुरुस्ती करून वीज पुरवठा पूर्ववत केला जात आहे असे महावितरणने सांगितले आहे.