वसई: वसई-विरार शहरात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन होताच विविध भागांत झाडांची पडझड झाल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. बुधवारी झालेल्या जोरदार वळवाच्या पावसामुळे शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी झाडे कोसळली. यातील एका घटनेत मोठे झाड थेट वाहनांवर कोसळल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर सुदैवाने सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

​झाड कोसळण्याची पहिली मुख्य घटना वसई पूर्व येथील औद्योगिक वसाहतीत घडली. येथे रस्त्याकडेला उभे असलेल्या दोन टेम्पोंवर एक मोठे झाड अचानक उन्मळून पडले. या अपघातात दादू सुळे आणि लखन शर्मा यांच्या मालकीच्या टेम्पोंचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कटर मशीनच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या कापून ते बाजूला केले आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला.

​याशिवाय शहरात अन्य तीन ठिकाणीही झाडे पडण्याच्या घटना घडल्या. विरार पश्चिमेकडील म्हात्रे वाडी परिसरातील प्रथमेश अपार्टमेंटसमोरील रस्त्यावर एक जंगली झाड कोसळले होते. तसेच विरारमधील फुलपाडा परिसर, वसई पश्चिमेकडील ‘डीएनए’ कार्यालयाजवळ आणि निर्मळ गणपती मंदिराजवळील भिडेवाडा भागातही झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या.

या सर्व ठिकाणांची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तत्परता दाखवत युद्धपातळीवर झाडे हटवण्याचे काम केले. सुदैवाने या सर्व दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रत्यक्ष मान्सून सुरू होण्यापूर्वीच, केवळ वळवाच्या पहिल्या पावसातच शहरात अशी पडझड सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी चिंता व्यक्त केली आहे.