वसई: वसई विरार शहरात बुधवारी सकाळी वळवाच्या पावसाने हजेरी लावली. सकाळच्या सुमारास अवघा अर्धा तास पडलेल्या पावसामुळे वसई विरारच्या रस्त्यावर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. 

रविवारपासून महाराष्ट्राच्या विविध भागात वळवाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. तर वसई विरारमध्येही पहाटेच्या सुमारास सलग दोन ते तीन दिवसांपासून वळवाचा पाऊस पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे वातावरणात गारवा पसरल्याने काहीकाळ उकाड्यापासून नागरिकांना दिलासा जरी मिळाला असला, तरी वर्दळीचे परिसर, सखल भाग आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये वळवाच्या पावसातच पाणी साचत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.

वसई विरार शहरात गेल्यावर्षी पावसाचे पाणी साचल्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. विरारमधील विराटनगर, रेल्वे स्थानक परिसर, नालासोपाऱ्यातील संतोषभुवन, वसईतील एव्हरशाईन, मधुबन, रेल्वे स्थानक, गिरीज तसेच औद्योगिक वसाहती अशा विविध परिसरात पाणी साचले होते. यामुळे शहरातील दळणवळण, बाजार, आरोग्य सुविधा, शाळा ठप्प झाल्या होत्या. नागरिकांवर ट्रॅक्टरचा आधार घेत प्रवास करण्याची वेळ आली होती.

तर यंदा ही परिस्थिती ओढवू नये यासाठी पालिकेकडून मान्सूनपूर्व तयारी अतिशय काटेकोरपणे केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच ७० टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावाही करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही अर्ध्या तासाच्या पावसात शहरातील रस्त्यांवर आणि सखल भागात पाणी साचत असल्यामुळे पालिकेचे दावे फोल ठरले असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. 

तसेच आमदार-खासदार, महापौर आणि नगरसेवक यांच्याकडून केल्या जाणाऱ्या पाहणीनंतर, विविध बैठकांनंतरही शहरात अशी परिस्थिती उद्भवत असल्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जात आहे.

नालेसफाईचा गाळ पुन्हा नाल्यात

शहरातील लहान – मोठ्या नाल्यांच्या सफाईनंतर निघणारा गाळ हा नाल्याच्या दोन्ही बाजूंना काढून ठेवला जातो. हा गाळ सुकला तो पालिकेकडून उचलला जातो. विविध ठिकाणी नाल्यांच्या कडेला असणारा गाळ अजूनही उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे वळवाचा पाऊस पडला की हा गाळ पावसाच्या सरींबरोबर पुन्हा नाल्यात वाहून जात असल्याचे दिसून येत आहे.