वसई: वसई विरार शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर खाजगी गृहसंकुलांच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. पण, शासनाने घालून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करत या प्रकल्पांची कामे सुरू असल्यामुळे त्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे. बांधकाम साहित्यामुळे वातावरणात पसरणारी धूळ आणि रात्री-अपरात्री होणाऱ्या यंत्रांच्या कर्णकर्कश आवाजामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
वसई विरार शहरातील बंगली नाका, स्टेला, एव्हरशाईन सिटी, आचोळे रोड, विराट नगर, बोळींज अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्पांची कामे केली जात आहेत. पण, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी विकासकांनी जाळ्या किंवा पडदे लावलेले नाहीत. तसेच प्रकल्पातील धूळ इतरत्र उडू नये म्हणून पाण्याची फवारणी, तसेच वायू गुणवत्ता मापन प्रणाली बसवण्यात आलेली नाही. परिणामी, वाहतुकीचे मुख्य रस्ते आणि गृहप्रकल्पांशेजारी असणारी घरे या धुळीने माखू लागली आहेत.
यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना खोकला, डोळ्यांची जळजळ आणि श्वसनाचे विकार असे त्रास होत आहे. तसेच रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी आणि वाहनचालकांनाही धुळीचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे, यंत्राच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिक त्रस्त आहेत. शासनाच्या नियमानुसार रात्री दहा वाजल्यानंतर मोठ्या आवाजात कामे करण्यास मनाई असताना देखील अनेक ठिकाणी पहाटेपर्यंत मिक्सर मशीन, पोकलेन आणि जड वाहनांची ये-जा सुरू असते. यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि नोकरदारांच्या झोपेवर विपरित परिणाम होत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीनुसार, बांधकामामुळे होणारे वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखणे ही संबंधित विकासकाची जबाबदारी आहे. मात्र, महापालिका आणि पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी आणि बांधकामाच्या वेळा निश्चित कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
कोट:-
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना यापूर्वी नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या. पण, आता पुन्हा एकदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई केली जाणार आहे. श्वेता माने, नगररचना अधिकारी
