वसई: रेबीज आजाराचे निर्मूलन करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने वसई-विरार शहर महानगरपालिकेतर्फे जागतिक रेबीज दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत पाळीव व भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यासोबतच पालिका क्षेत्रातील तब्बल ८५ शाळांमधील विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेबीजबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले.

यंदा २०२६ या वर्षासाठी स्ट्रॉन्गर टुगेदर (सोबत मिळून, रेबीजमुक्त जग) ही अधिकृत संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आंतर-विभागीय सहकार्य, जनसहभाग आणि वन हेल्थ दृष्टिकोनावर विशेष भर देत २८ सप्टेंबर रोजी महापालिका क्षेत्रात व्यापक मोहीम राबवली.या उपक्रमांतर्गत महानगरपालिका आणि प्रतापराव राणे एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ९३ श्वानांना, तर हॅपी ॲनिमल फाउंडेशन या संस्थेमार्फत ७५ श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली. या मोहिमेदरम्यान नागरिकांना रेबीजचा प्रतिबंध कसा करावा, श्वान चावल्यानंतर तातडीने कोणती प्रथमोपचार व वैद्यकीय खबरदारी घ्यावी, याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शन करण्यात आले.

पालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली ‘मिशन रेबीज’ या संस्थेच्या सहकार्याने विशेष ऑनलाइन सत्र आयोजित करण्यात आले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकाच वेळी ८५ शाळांमधील विद्यार्थ्यांना रेबीजविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उप-आयुक्त डॉ. करुणा जुईकर, सहायक आयुक्त जितेंद्र नाईक, मिशन रेबीजचे प्रतिनिधी आणि मनपा आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

जनजागृती व लसीकरण शिबीर

पालघर जिल्हा पशुसंवर्धन विभागांतर्गत पशुवैद्यकीय चिकित्सालय निर्मळ येथे जागतिक रेबीज दिन साजरा करण्यात आला; यानिमित्त निर्मळ चिकित्सालयात रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबीर आयोजित करण्यासोबतच जि. प. शाळा कळंब येथे जनजागृतीपर मार्गदर्शन, चित्रकला स्पर्धा व अंगणवाडीतील बालकांना मार्गदर्शन करण्यात आले. कोकण विभागाचे पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. बाबूराव नरवाडे व पालघर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भुवनेश्वर बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम पार पडल्याची माहिती डॉ. मधुवंती महाजन यांनी दिली.