वसई :- वसई विरारशहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी यासाठी चार रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आले आहेत. या पुलाची कामे प्राधान्याने मार्गी लागावी यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारी महापौर अजीव पाटील यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला. यावेळी विरार आणि नालासोपारा भागातील पुलाचे काम प्राधान्याने सुरू केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

वसई विरार शहराचे क्षेत्रफळ ३८० चौरस किलोमीटर असून शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. याशिवाय शहरात वाहनांची संख्या ही बेसुमार वाढत आहे. त्यामुळे रस्ते अपुरे पडू लागले आहेत. तर अपुऱ्या रस्त्यांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडी ही शहराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी होत असते. त्यासाठी रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार करून एमएमआरडीएकडे पाठविला होता. त्यामध्ये उमेळमान (वसई), आचोळे (नालासोपारा) अलकापुरी (नालासोपारा) आणि विराट नगर (विरार)या चार उड्डाणपूलांचा समावेश होता. या पुलांच्या कामाला गती मिळावी यासाठी मुंबईत एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी व महापौरांच्या शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली होती. त्या बैठकीत या पुलांच्या कामे लवकर सुरू केली जातील असे आश्वासन दिले होते.

याच अनुषंगाने मंगळवारी महापौर अजीव पाटील, एमएमआरडीएचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी यांनी प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलांचा पाहणी दौरा केला. यावेळी जो काही नियोजित आरखडा व त्यात सद्यस्थितीत येत असलेल्या अडचणी ही समजून घेतल्या आहे. यात सुरुवातीला विराटनगर व ओसवालनगरी येथील दोन्ही बाजूच्या जागेची उपलब्धता लक्षात घेऊन येथील काम लवकरच सुरू केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रेल्वे स्थानक व रेल्वे रुंदीकरण काम सुरू असल्याने पुलाच्या कामाला विलंब होत होता. मात्र, आता हे अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे ही कामे लवकर मार्गी लागतील असे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांशी चर्चा सुरू

अलकापुरी नालासोपारा आणि वसई उमेळमान या दोन रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी दोन्ही बाजूने जागा संपादित केली जाणार आहे. या आवश्यक असलेल्या जागेच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या सोबत चर्चा सुरू आहे. यात शेतकऱ्यांच्या प्रश्न लक्षात घेऊन ते सुद्धा सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापौर अजीव पाटील यांनी सांगितले आहे.

विरार आणि नालासोपारा पुलावरील कोंडी सुटणार

विरार आणि नालासोपारा पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पुलावर सकाळ संध्याकाळ दररोज प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. या कोंडीत सर्वसामान्य प्रवाशांसह रुग्णवाहिका ही अडकून पडण्याच्या घटना घडतात. जर विराट नगर आणि ओसवाल नगरी येथील रेल्वे उड्डाणपूल झाल्यास दोन्ही पुलावर होणारी वाहतूक कोंडी नियंत्रणात येण्यास मोठी मदत होईल.