वसई: एप्रिल महिन्यात पार पडलेला महासभेत महापौर अजीव पाटील यांनी आठवडाभरात रेल्वे स्थानके फेरीवाला मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्याचे बस्तान कायम असल्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वसई विरार शहरातील वाढत्या लोकसंख्येसह फेरीवाल्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाच्या कारवाईचा धाक न उरल्यामुळे शहरातील स्थानिक फेरीवाल्यांसह मुंबई, पालघर अशा नजीकच्या शहरातून येऊन सामानाची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांनीही शहरातील महत्त्वाचे चौक, वर्दळीचे रस्ते, आणि रेल्वे स्थानके व्यापायला सुरुवात केली आहे.

तर रेल्वे स्थानक परिसरात दुतर्फा बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे ही समस्या अधिकच भीषण बनली आहे. एकीकडे तयार होणारे अवैध रिक्षा थांबे आणि दुसरीकडे रस्त्याच्याकडेला बसणारे फेरीवाले यामुळे पदपथांसह रेल्वे स्थानक परिसराला लागून असणारे मुख्य वाहतुकीचे रस्तेही आता अरुंद झाले असून नागरिकांना प्रचंड गर्दीतून वाट काढत प्रवास करावा लागतो.

नालासोपारा पूर्व, विरार पश्चिम या रेल्वे स्थानकातील रस्ते आधीच अरुंद असून त्यात फेरीवाल्यांमुळे ते अधिकच चिंचोळे झाले आहे. अनेकदा गर्दीच्या वेळी आणि खासकरून संध्याकाळच्यावेळी वाहनचालकांना साधी दुचाकी वळवतानासुद्धा खूप कसरत करावी लागते. तसेच रिक्षाला किंवा फेरीवाल्यांच्या स्टॉलला एखाद्यावेळेस चुकून धक्का लागल्यास वादाचे प्रसंग देखील निर्माण होतात, अशी प्रतिक्रिया विरार रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिली आहे.

एप्रिल महिन्यात पार पडलेल्या महासभेत नगरसेवकांमार्फत हा प्रश्न महासभेत मांडण्यात आला. त्यानंतर याची दखल घेत येत्या आठवड्याभरात रेल्वे स्थानके फेरीवालामुक्त केली जातील, असे आश्वासनही महापौर अजीव पाटील यांनी दिले. मात्र, या आश्वासनाला महिना उलटूनही फेरीवाले रेल्वे स्थानक परिसरात ठाण मांडून असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या महासभेत नगरसेवकांनी हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे फेरीवाल्यांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

दिवसेंदिवस वाढणारी फेरीवाल्यांची संख्या, रस्त्यावर आणि पदपथांवर होणारे अतिक्रमण, फेरीवाल्यांची अरेरावी यामुळे दररोज वाहतूक कोंडी, गर्दी, वाद, किरकोळ अपघात आणि अस्वच्छता यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे पालिकेने फेरीवाल्यांना हटवण्यासाठी तीव्र मोहीम राबवायला हवी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

महापालिकेकडून अवैध फेरीवाल्यांना हटवण्याची मोहीम सुरू आहे. पदपथ, रस्ते आणि चौक मोकळे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सातत्याने ही मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे नक्कीच रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त होईल. अजीव पाटील, महापौर, वसई विरार महापालिका