वसई: पश्चिम रेल्वेवरील मिरारोड ते वैतरणा रेल्वे स्थानकातून प्रवाशांकडून रूळ ओलांडून धोकादायक प्रवास करण्याचे प्रकार सुरूच आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षांपासून वसई विरार शहाराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. अनेकांना मुंबईसारख्या ठिकाणी वाढत्या महागाईच्या काळात घर घेणे परवड नसल्याने ते स्थलांतरित होऊन वसई विरार शहरात येत आहेत. त्यामुळे रेल्वे लोकल गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या बेसुमार वाढली आहे.

विरार, नालासोपारा, वसई, नायगाव, भाईंदर, मिरारोड या स्थानकातून मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यातही नालासोपारा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. काही प्रवासी थेट रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करतात. रेल्वे रूळ ओलांडणे हे केवळ बेकायदा नव्हे तर अधिक  धोकादायक आहे. परंतु लवकर जाण्यासाठी, जिने चढउतार करण्याचा कंटाळा अशा प्रकारामुळे अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत असतात. यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना समोर येत असतात.

सद्यस्थितीत लोकल, मालवाहतूक गाड्या, मेमो , एक्सप्रेस अशा गाड्यांच्या फेऱ्या ही वाढल्या आहे. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करणे अधिक धोक्याचे बनले आहे. प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी पादचारी पूल, सरकते जिने, संरक्षण जाळ्या, उड्डाणपूल , भुयारी मार्ग आदींची व्यवस्था केली आहे. तरीही काही प्रवासी अजूनही रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.

मागील वर्षभरात १७० जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. बहुतेक अपघात हे रेल्वे रूळ ओलांडून जाताना लोकलची धडक लागून घडले आहेत. प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडून जाऊ नये यासाठी वारंवार सूचनाही केल्या जातात.  याशिवाय जनजागृती करणे, कारवाई करणे अशा उपाययोजना केल्या जातात असे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे.