वसई: दरवर्षी पावसाळ्यात वसई आणि विरार रेल्वे स्थानकांदरम्यान रुळांवर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होत असते. अशा परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेने रेल्वे मार्गा जवळील नाले व कलव्हर्ट प्रभावीपणे स्वच्छ करून घेतले जात आहेत.पश्चिम रेल्वे लोकल सेवेतून वसई विरार शहरातून दररोज लाखो प्रवासी हे विरार ते चर्चगेट असा प्रवास करतात. मात्र मागील काही वर्षांपासून वसई विरार शहरात पूरस्थितीची समस्या निर्माण होत आहे. या निर्माण होणाऱ्या पूरस्थितीमुळे अनेकदा पाणी रुळावर साचते. त्याचा फटका पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेला ही बसतो.

मागील वर्षी सुद्धा नालासोपारा येथील भागात रुळावर पाणी साचल्याने रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली होती.रेल्वे सेवा पावसाळ्यात सुरळीत पणे सुरू राहावी यासाठी महापालिकेने रेल्वे अधिकारी यांची बैठक घेत विशेष उपाययोजना आखल्या आहेत. यात रेल्वे रुळांच्या कडेला असलेले छोटे-मोठे नाले आणि रेल्वे मार्गाखालून जाणारे कल्व्हर्ट्स (बोगदे) यांमधील गाळ उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जेणेकरून पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने होईल.

तसेच आयआयटीने जे उपाय सुचविले आहेत त्याबाबत रेल्वेच्या संपर्कात राहून काम पूर्ण करण्यावर महापालिकेचा भर असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.रेल्वे वाहतूक सेवा ही मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वे मार्गावर पाणी साचू नये यासाठी त्याभागातील नाल्यांची प्रभावीपणे स्वच्छता करण्यात आली आहे. याशिवाय कलव्हर्ट ७८ च्या अडचणी होत्या त्या सुद्धा दूर करण्यात आल्या आहेत.- संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त महापालिका