​वसई: मागील तीन दिवसांपासून वसई-विरार शहरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या २४ तासांत शहरात तब्बल १५० मिमी पावसाची नोंद झाली असून, अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी विविध भागांचा पाहणी दौरा केला. मात्र यादरम्यान नागरिकांच्या तीव्र रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागले.

​बुधवारी वसई पूर्वेकडील राजावळी वाघराळपाडा येथे नाल्याच्या पाण्याचा वेग प्रचंड असल्याने दोन कार आणि तीन दुचाकी अशी एकूण पाच वाहने वाहून गेल्याची गंभीर घटना घडली होती. सुदैवाने, या दुर्घटनेतून दोन जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले.

​या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी पालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी भेट दिली. मात्र, दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरस्थितीच्या प्रश्नावरून स्थानिक रहिवासी अत्यंत संतप्त झाले होते.

यावर आयुक्तांनी परिस्थितीची पाहणी करत, संबंधित नाल्यांवर तात्काळ संरक्षण जाळ्या बसवण्याचे तसेच इतर आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. तसेच, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी तात्काळ पालिकेला माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

भोयदापाडा येथे डंपिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावरून वाद

दुसरीकडे, वसईतील भोयदापाडा येथेही नागरिकांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. येथील डंपिंग ग्राऊंडमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी आणि दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यात डंपिंग ग्राऊंडमधून वाहणारे हे दूषित पाणी थेट रस्त्यांवर आणि स्थानिक नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असल्याने आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ​या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी संतप्त नागरिकांनी थेट आयुक्तांचे वाहन अडवून त्यांना जाब विचारला. “आयुक्तांनी डंपिंग ग्राऊंडची प्रत्यक्ष पाहणी करण्यास नकार दिला,” असा आरोप करत नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. या आंदोलनादरम्यान स्थानिक रहिवासी नम्रता वैती-ठाकूर आणि अतुल मोटे यांनी प्रशासनाकडे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आक्रमक मागणी केली.